कुंदन पाटील
जळगाव : जिल्हा प्रशासनातील तलाठीपदाच्या २३१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार २३१ जणांसह प्रतिक्षायादी जाहीर केली असताना दाखल होणाऱ्या तक्रारी, आक्षेपांवर सुनावणी करण्यासाठी तीन यंत्रणांकडे जबाबदारी सोपविली आहे.
जिल्ह्यातील २४१ जागांसाठी गेल्यावर्षी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील १० जागा ‘पेसा’ क्षेत्रातील १० जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.तसेच धाराशिव येथील परीक्षा केंद्रावरच्या गैरप्रकारामुळे २३१ पैकी अन्य तिघांचाही निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यस्तरीय निवड समितीकडून आदेश येत नाहीत तोपर्यंत १३ जागांचा निकाल राखीव ठेवला जाणार आहे.
अशी होणार सुनावणी
उमेदवारांच्या यादीवर, भरती प्रक्रियेवर आक्षेप किंवा तक्रारी आल्यास पहिली सुनावणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्याकडे होणार आहे. सुनावणीनंतरही तक्रारदाराचे समाधान न झाल्यास त्याला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करता येईल. त्याठिकाणी दुसरी सुनावणी होईल. त्यातूनही समाधान न झाल्यास जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अंतिम सुनावणी घेणार आहेत.या तीनही सुनावणीदरम्यान महसुल विभागाचे तहसीलदार सादरकर्ता अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील.