जळगाव : दीड महिन्यानंतर दारु दुकाने सुरु करण्याचे आदेश झाल्यानंतर मंगळवारी तळीरामांनी दुकाने सुरु होण्याआधीच दुकानांसमोर तळ ठोकल्याचे चित्र शहरात दिसून आले. भूक व तहान विसरुन दुकानांसमोर थांबून होते. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले तर काही ठिकाणी अक्षरश: फज्जा उडाला. दुपारुन भर उन्हात तळीरामांच्या रांगा लागल्या होत्या.लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून मद्य विक्रीची दुकाने व बार बंद झाले होते. सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्य विक्री करणारे वाईन शॉप, बियर शॉप व देशी मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. मात्र त्या-त्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात मंगळवारपासून दारु दुकाने सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी परवानगी दिली. त्यात सील बंद बाटलीतूनच मद्य विक्री करावी. दुकानावर पिण्यास मनाई, सोशल डिस्टन्सिंगसाठी दोन ग्राहकांमध्ये सहा मीटरचे अंतर, दुकानाजवळ बॅरिकेटींग, सॅनिटायझरची फवारणी व ग्राहकांसाठी सॅनिटायझर अशा अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत.सकाळी ९ वाजेपासून रांगाराज्यात इतर जिल्ह्यात सोमवारीच दुकाने सुरु झाली. जिल्ह्यात मंगळवारपासून दारु दुकाने सुरु होणार असल्याने तळीरामांनी सकाळीच ९ वाजेपासून दारुच्या दुकानांच्या बाहेर तळ ठोकला होता. दुकाने सुरु व्हायला वेळ असला तरी आपल्यालाच लवकर मिळावी म्हणून तळीराम रांगेत होते. अनेक ठिकाणी शिस्त पाळण्यात आली तर काही ठिकाणी झुंबड उडाली होती. इच्छा देवी चौकात तर सकाळी अर्ध शटर उघडून मद्य विक्री सुरु झाली होती. भजे गल्ली, जिल्हा रुग्णालय परिसरात रांगाच रांगा लागल्या होत्या. तडपत्या उन्हातही मद्यपी रांगेत होते. भविष्यात आणखी बंदचे आदेश येऊ शकतात, या धास्तीने अनेकांनी अतिरिक्त कोटा करुन घेतला.काही लाजले, काहींनी दुसºयाला केले उभेसमाजात आपले वेगळे स्थान आहे, त्यामुळे आपण दारु दुकानाच्या रांगेत थांबलो आणि कोणी पाहिले तर काय? या भीतीने अनेकांनी विशिष्ट रक्कम देऊन मजुरी करणाºया तसेच ओळखीच्या लोकांना रांगेत उभे केले होते तर काही जणांनी मालकांशीच संपर्क करुन दारुच्या बाटल्यांची आधीच बुकींग करुन ठेवली होती. एक दोन ठिकाणी तर उच्चभ्रुही रांगेत दिसले.
तळीरामांनी दारु दुकानासमोर ठोकला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 1:15 PM