चर्चा महायुती, आघाडीची अन् तयारी स्वबळाची ? कॉग्रेस, अजित पवार गटाने केली समन्वयकाची नियुक्ती

By सुनील पाटील | Published: January 8, 2024 07:19 PM2024-01-08T19:19:14+5:302024-01-08T19:19:21+5:30

लोकसभेसोबतच विधानसभेचीही चाचपणी

Talk about alliance, preparation for self | चर्चा महायुती, आघाडीची अन् तयारी स्वबळाची ? कॉग्रेस, अजित पवार गटाने केली समन्वयकाची नियुक्ती

चर्चा महायुती, आघाडीची अन् तयारी स्वबळाची ? कॉग्रेस, अजित पवार गटाने केली समन्वयकाची नियुक्ती

जळगाव : जागांचे वाटप होण्याआधीच लोकसभेचे वातावरण तापू लागले आहे. भाजपविरुध्द लढण्यासाठी देशभरातील सर्वच पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे तर भाजपने राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष फोडून एक गट आपल्याकडे वळविला आहे. या गटांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविला जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील कॉग्रेस व महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्येक जिल्ह्यात लोकसभेसाठी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करुन स्वबळाच्या दिशेने तयारी केल्याचे दिसून येत आहे.

कॉग्रेसने देशभरात लोकसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून प्रत्येक नेत्यावर जबाबदारी सोपविली आहे. राज्यात ४८ मतदारसंघाची यादी जाहीर झाली आहे. त्यात जळगावसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर, रावेरसाठी आमदार प्रणिती शिंदे, नंदूरबारसाठी आमदार कुणाल पाटील व धुळ्यासाठी माजी मंत्री नसीम खान यांची नियुक्ती झाली आहे. कॉग्रेसचे राष्ट्रीय महासचिव खासदार के.सी.वेणुगोपाल यांनी यादी जाहिर केली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने देखील प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडेच समन्वयक प्रमुक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना व इतर ११ घटक पक्षांच्या वतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यासह अन्य घटक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. या मेळाव्याला त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसभेसोबतच विधानसभेचीही चाचपणी
समन्वयाच्या माध्यमातून पक्षातील काही महत्त्वाचे निर्णय, अंतर्गत बाबी, विकासात्मक कामाच्या चर्चा, पक्षीय भूमिका, तसेच अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. दरम्यान ही नियुक्ती व जिल्हा मिळावे म्हणजे लोकसभेसोबतच,विधानसभा व अन्य निवडणुकांचीही चाचपणी असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टाकलेल्या या जबाबदारीच्या संधीचे सोने करु असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Talk about alliance, preparation for self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.