सावदा, ता. रावेर : चिनावल येथील रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट पंचायत समितीकडून घातला जात आहे. रावेर येथे कोणतीही सोयी-सुविधा नसताना ऐन कोरोना काळात काही पंचायत समिती सदस्यांनी तालुका वैद्यकीय कार्यालयाची पळवापळवी चालवली आहे. या पळवापळवीला नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. तालुका स्तरावर वैद्यकीय अधिकारी कार्यालय हवे, अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी मागणी केली होती. तसा ठरावही पंचायत समिती बैठकीत संमत करण्यात आला होता; परंतु आजच रावेर येथे कार्यालयासाठी वा लसीसाठी सोयी-सुविधा नसल्याने कार्यालय हलवणे सोयीचे ठरणार नसल्याचे चित्र आहे.
तालुका वैद्यकीय कार्यालय तालुक्याच्या आरोग्य सुविधेच्या दृष्टिकोनातून मध्यभागी आहे. सात प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी दोन ऐनपूर व वाघोड रावेरनजीक आहे. उर्वरित पाच आरोग्य केंद्रे खिरोदा, चिनावल, लोहारा, थोरगव्हाण, निंभोरा हे चिनावल येथे सोयीचे आहेत. या ठिकाणाहून विविध वैद्यकीय साहित्य, लस ने-आण करता येत असते. त्यामुळे चिनावल हे गाव तालुक्याचा कार्यभार पाहण्यास सोयीचे जाते.
कर्मचारी वर्ग
रावेर येथे कार्यालय स्थलांतरित करण्यात आल्यास लसीची देखरेख करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. अशा परिस्थतीत लसींची व्हीव्हीएम देखरेख वेळोवेळी न झाल्यास व लस खराब होऊन लाभार्थींना दिली गेल्यास जीवित हानी होऊ शकते.
राजकारण शिजतेय
रावेर येथे कार्यालय स्थलांतर करण्यासाठी समस्या असताना पंचायत समिती सदस्यांचा घाट कशासाठी यात नेमके कोणते राजकारण शिजते आहे, या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तक्रार नाही
कोरोना काळात ग्रामीण भागातील कोरोना लसीची वाटप चिनावल येथील वैद्यकीय अधिकारी कार्यालयातूनच केली जात असते. आताच कार्यालयाची हालचाल केल्यास या सर्व बाबींची उपायोजना करावी लागणार आहे. फक्त जागा उपलब्ध झाली म्हणून सर्व काही आलबेल होणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय हे चिनावल येथेच आहे. कोणतीही तक्रार कार्यालयाची नाही.
चिनावल येथील तालुका वैद्यकीय कार्यालय रावेर येथील पंचायत समितीजवळील हाॅलमध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. चिनावल येथील वैद्यकीय तालुका कार्यालय अंतर्गत तालुक्यात सात आरोग्य केंद्रे आहेत. चिनावल आरोग्य केंद्राच्या सात ते नऊ किलोमीटर परिसरात खिरोदा, लोहारा, निंभोरा, थोरगव्हाण, चिनावल असे पाच आरोग्य केंद्र असून सोईचे आहे. २५ किलोमीटर नेण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुका वैद्यकीय कार्यालय हलविण्याचा घाट हाणून पाडण्यासाठी जनअंदोलन करण्यात येईल.
- कमलाकर रमेश पाटील, नागरिक, कोचूर, ता. रावेर
कोरोना काळात तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातून नागरिकांची सेवा अव्याहतपणे सुरू आहे. आजपर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण तालुक्यातील नागरिकांना आलेली नाही. मग चिनावल येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय हलविण्याची गरज काय?
-श्रीकांत सरोदे, नागरिक, चिनावल
चिनावल येथील वैद्यकीय अधिकारी कार्यालय रावेर येथे स्थलांतरासाठी पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव संमत करण्यात आला होता. परंतु सध्या कोरोना काळ आहे. त्यामुळे पंचायत समितीने वैद्यकीय अधिकारी कार्यालय चिनावल येथेच राहू द्यावे.
- गोपाळ नेमाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, रावेर
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचे मुख्यालय हे तालुक्यावरच असले पाहिजे असे संकेत आहेत. पण आपल्या तालुक्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय हे सुरुवातीपासूनच चिनावल प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. त्या अनुषंगाने तालुका प्रशासन व सातही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयासाठी हे कार्यालय रावेर पं.स. कार्यालयात स्थलांतरित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाची इमारत रिकामी झाल्यानंतर व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय स्थलांतरित करण्यात येईल.
-दीपाली कोतवाल-पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, रावेर