पारोळा - तालुक्यातील तामसवाडी येथील मंडळ अधिकारी टी.एल.शिंदे यांनी सलग दोन दिवस दारूच्या नशेत निवडणूक नायब तहसीलदार पंकज पाटील यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप विविध संघटनांतर्फे केला जात आहे. या प्रकरणी सदर कर्मचाºयास निलंवित करावे अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघ, छावा संघटना व महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार ए.बी गवांदे यांना दिले.मंडळ अधिकारी टी.एल.शिंदे हे मागील वर्षभरापासून आपल्या कामात दिरंगाई करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने प्रभारी तहसीलदार पदभार असताना आताचे निवडणूक नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग येऊन शिंदे यांनी यापूर्वीदेखील पंकज पाटील यांना तहसील आवारात शिवीगाळ केली होती. त्या वेळी पंकज पाटील यांनी दुर्लक्ष केले. परंतु १४ रोजी सायंकाळी कार्यालयात शिंदे यांनी दारू पिवून पंकज पाटील यांच्याशी वाद घालीत शिवीगाळ केली तसेच धमकी दिली. या बाबत पंकज पाटील यांनी या बाबत वरिष्ठांना माहिती दिली. यावेळी इतर कर्मचाºयांनी शिंदे यास बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.दुसºया दिवशी १५ रोजी याच शिंदे यांनी तहसील कार्यालयातच मराठा सेवा संघाचे संदीप पाटील, छावा संघटनेचे विजय पाटील, प्रताप पाटील हे उभे असताना त्यांच्यासमोर पंकज पाटील यांना पुन्हा शिवीगाळ करीत धमकी दिली. माझे कोणी काही करू शकत नाही, मी उलट जातीवाचक गुन्हा दाखल करेल असे सांगत पळ काढला. यावेळी काही कर्मचाºयांनी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना बोलविले. त्यामुळे तहसील कार्यलयात शांतता पसरली होती.सर्व महसूल कर्मचारी व मराठा सेवा संघटना, छावा संघटने कडून कारवाई बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी अनिल पाटील बी.टी.पाटील, निशिकांत पाटील, एस.एस.पाटील, डी.ए. नाईक, एन.एस.पाटील, ज.आ.पाटील, के.बी.माळी, वैशाली जाधव, व्ही.आर.सरदार, सुदाम भालेराव, व्ही.व्ही.गिरासे, पी.ए.पाटील, आर.बी.पाटील, ए.एस.चौधरी यांच्यासह मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित होते.या प्रकरणी नायब तहसीलदार पंकज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ते पोलिसांच्या तावडीतून निसटल्याने मराठा सेवा संघ व छावा संघटनेने पोलिसांच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केले. गुन्हा दाखल प्रकिया सुरू असताना शिंदे हे स्वत:हून पोलीस स्टेशनला आले. मला पंकज पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद द्यायची आहे असे सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व ठाणे अंमलदार प्रकाश चौधरी यांनी वैद्यकीय तपासणी करण्याबाबत त्यांना सांगितले असता काही वेळाने शिंदे हे पोलीस स्टेशन मधून निघून उंदिरखेडे फाट्याजवळ एका वाहनावर बसून धुळे कडे गेल्याचे काहींनी सांगितले.
तामसवाडी येथील मंडळ अधिकाऱ्यांची नायाब तहसीलदारांना शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:27 PM