सूर्यकन्या,खान्देशची गंगा, तापिनी, सत्या,सावित्री, तारा अशा सुमारे २१ प्रकारच्या नावाने संबोधल्या जाणाऱ्या तापी नदीचा ‘प्रकट दिन’ आषाढ शु.सप्तमी शुक्रवारी श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थानाजवळील संगमावर मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील वायव्य सरहद्दीवर वसलेल्या तापी काठावरील पुरातन श्रीक्षेत्र कपिलेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी संस्थानचे वास्तुविशारद आनंद मधुकर दुसाने यांनी सपत्नीक तापीमाईस साडी-चोळी अर्पण करून विधिवत मंत्रोच्चारांच्या घोषात नदीचे पूजन केले. महामंडलेश्वर १००८ श्री हंसानंदजी तिर्थ यांचे मार्गदर्शनाखाली स्वामी देवेश्वर तिर्थ यांनी यावेळी पौरहित्य केले. यावेळी संस्थानचे सचिव मगन पाटील,विश्वस्त तुकाराम चौधरी,मंगल पाटील,नामदेव कोळी ,पाठशाळेचे बाल-गोपाल,व भाविक उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रवेश
गंगा स्नाने,नर्मदा दर्शने,तापी स्मरणे...गंगेच्या स्नानाने जेवढे पुण्य लाभते तेवढेच नर्मदा दर्शनाने,मात्र तापी माईच्या केवळ स्मरणाने पुण्य लाभते. असा तापीचा महिमा तापी माहात्म्य, ग्रंथात केलेला आहे. उगमापासून विसर्जनापर्यंत तापी नदी किनाऱ्यावर एकूण १०८ प्रसिद्ध तीर्थस्थळं आहेत.त्यापैकी शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावी तापी काठावर ‘स्थालेश्वर’ नावाचे तीर्थक्षेत्र आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अजनाड गावापासून तापी नदीचा जिल्ह्यात प्रवेश होतो.