एरंडोल/ पाळधी, कढोली : टाकरखेडा ता. एरंडोल येथे गेल्या तीन दिवसांपासून डायरीयाचा ७० जणांपेक्षा जास्त जणांना लागण झाली असून त्यांच्यावर गावात आरोग्य शिबिर लावून उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त लोक यामुळे बाधित झाले असून काहींनी खासगी दवाखान्यात उपचार करून घेतले. मंगळवारी आरोग्य शिबिरात ६ जणांवर उपचार सुरु होते.दूषित पाण्यामुळे ही लागण झाल्याचे सांगण्यात आले. १३ रोजी प्रथम १२ जणांना लागण झाली. तर १४ रोजी तब्बल ५६ जणांना बाधा झाली आणि १५ रोजी आणखी दोन जणांची त्यात भर पडली. त्यामुळे बाधितांची संख्या ७० पर्यंत पोहचली आहे. यात काही जणांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले असून त्यामुळे बाधितांची संख्या १०० पेक्षा जास्त असल्याचे जाणकार सूत्रांनी सांगितले. दरम्यान, डायरीयाच्या लागणमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे.टाकरखेडा या सुमारे दोन हजार लोकसंख्येच्या गावात डायरीयाची ही लागण दूषित पाणीपुरवठ्यामुळे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.गावात सदर लागण ही गेल्या बुधवारपासून सुरू झाली असून आठवडा उलटूनही डायरीयाची साथ आटोक्यात आणण्याकामी ग्रामीण आरोग्य यंत्रणेला अद्यापही यश मिळालले नाही.सदर गावाला पाणीपुरवठा हा गिरणा नदीवरून जलवाहिनीद्वारे करण्यात येतो. मात्र गावातील जलवाहिनीला ठिकठिकाणी असलेल्या मोठ्या प्रमाणावरील गळत्यांमुळे त्यात खड्ड्यांमधील साचलेले घाण पाणी शिरत असते. आणि ते पाणी प्यायल्यामुळे सदर लागण झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान, बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अंगणवाडीत कॅम्प लावण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज शेख, डॉ. शहा हे रुग्णांवर उपचार करीत आहेत, काही रुग्ण शिबिराव्यतिरिक्त खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. दरम्यान, गावात डायरियाची लागण झाल्याचे वृत्त समजताच आमदार डॉ. सतीश पाटील यांनी गावास भेट देऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लागण त्वरित आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच पंचायत समिती सभापती रजनी सोनवणे, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे पवार आदी संबंधित यंत्रणा प्रमुखांनी सुद्धा भेट दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनीदेखील समक्ष भेटीद्वारे रुग्णांच्या तब्येतीची चौकशी केली.दरम्यान, गावात लावण्यात आलेले आरोग्य शिबिर ७ दिवस आणि २४ तास सुरू राहणार असल्याची माहिती उपचार करणारे डॉ. दीपक साळुंखे यांनी दिली.
टाकरखेडा येथे ७० जणांना डायरीयाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:57 AM
एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा येथे गेल्या तीन दिवसांपासून दूषित पाण्यामुळे सुमारे ७० पेक्षा जास्त जणांना डायरीयाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचारासाठी गावात आरोग्य शिबिर लावण्यात आले आहे.
ठळक मुद्देशंभरपेक्षा जास्त जणांना लागण झाल्याचे माहितीगारांचे म्हणणेगावात लावले उपचार शिबिर