धानोरा, ता.चोपडा : येथील जळगाव रोडवरील टाटा इंडिकॅश बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांंनी २९ जुलै रोजी पहाटे फोडले. मात्र रोख पळवून नेण्यात त्यांना अपयश आले.धानोरा-जळगाव बसस्थानकाजवळील ग्रामपंचायत संकुलातील टाटा इंडिकॅश बँकेचे एटीएम रविवारी रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्यादरम्यान अज्ञात चोरट्यांंनी फोडले. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून एटीएमचा पुढील भाग तोडला. मात्र रोख रक्कम असलेल्या कप्प्याचा पत्रा त्यांना तोडण्यात अपयश आले. त्यामुळे रक्कम सुरक्षित राहिली.येथे टाटा इंडिकॅश बँकेचे गेल्या ४ ते ५ वर्षांपासून एटीएम बसविले आहे. परंतु सुरक्षारक्षक नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच पोलीसांनी रात्रीला गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्तांमधून होत आहे.या घटनेची माहिती पोलीस पाटील दिनेश पाटील यांनी सकाळी अडावद पोलीस स्टेशनला कळविताच सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांच्यासह यादव भदाणे, जगदीश कोळंबे यांनी पाहणी केली. ३० रोजी सकाळी चोपड्याचे डी.वाय.एस.पी. सौरभ अग्रवाल यांनी घटनेची पाहणी करून माहिती घेतली व तपासाच्या सूचना केल्या. या घटनेबाबत उशिरापर्यन्त फिर्याद देण्यास कोणीही न आल्याने गुन्हा नोंद झाला नव्हता .
धानोऱ्यात टाटा इंडिकॅश बँकेचे एटीएम फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 6:36 PM