अमित महाबळ, जळगाव : राज्यात अनेक वर्षांनी ३४ जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांची दोन हजारपेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार होती. त्यासाठी अर्ज भरले गेले मात्र, न्यायालयात आव्हान मिळताच जूनच्या शेवटी नियोजित असलेली परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.
केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेतली जाणार होती. त्याची अधिसूचना ५ जूनला काढून परीक्षापूर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये २,३८४ पदे भरली जाणार होती.
केंद्र प्रमुख हे प्रशासन व शाळा यांच्यात दुवा म्हणून काम करतात. किमान १० शाळांच्या संकुलाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. या शाळांवर देखरेख, नियंत्रण ठेवण्याचे काम त्यांचे असते. मात्र, त्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने प्रशासकीय कामांचा खोळंबा होत होता. या पार्श्वभूमीवर भरती निघाली होती. केंद्र प्रमुख पदासाठी शिक्षक जि. प. शाळांमध्ये कार्यरत शिक्षक अर्ज करू शकणार होते. उमेदवार ज्या जिल्हा परिषदेत कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहणार होता. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. १५ जून होती. यानंतर परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय न्यायालयात दाखल आव्हान याचिकांमुळे झाला आहे.