चोपडा : मार्च महिन्यापासून कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान माजविले असल्याने जिल्हा नव्हे तर राज्य आणि देशभरातील सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने बहुतांश कंपन्या, औद्योगिक क्षेत्रात नोकरीला असलेले व विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे गावापासून लांब असलेले सर्वच गावात परतलेले आहेत. मात्र गावात त्यांना उपजीविका चालविण्यासाठी विविध व्यवसाय करावे लागत आहेत.बरेच विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक हे कोणी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहे, तर कोणी रंगकाम, पेंटिंग चा व्यवसाय करीत आहे, तर कोणी युट्युब वर व्हिडिओ बनवून त्याला लाईक मिळवून मानधन मिळवण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत. तर काही शिक्षक हे शेती कामाला जाऊ लागले आहेत.जे शिक्षक बाहेर गावी विनाअनुदानित शाळेत होते परंतु गावावर त्यांची शेती होती असे शिक्षक शेतात जाऊन शेती करीत आहेत. यासह इतर वाटेल ते काम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक करीत आहेत.शाळा कधी सुरू होतील हे अजूनही अधांतरीत असल्याने या शिक्षकांना शाळा सुरू होईल आणि आपणास पुन्हा कामावर गेल्यानंतर उपजिविकेसाठी काही अंशी मानधन मिळेल अशी आशा सध्यातरी नाहीये. म्हणून बऱ्याच शिक्षकांनी विविध व्यवसाय सुरू केलेले आहेत. या महामारीच्या कोरोनाव्हायरस संसर्गाच्या आजारामुळे सर्वच लोकांना अभूतपूर्व असे अनुभव आल्याने जीवनाचे मूल्य शिकायला मिळाले असल्याने प्रत्येक जण त्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी काम करीत आहेत. त्याप्रमाणे शिक्षकही काम करीत आहेत. तर शिक्षक स्वत: घरात फळ्याचा उपयोग करून क्लासेस घेऊन यूटयूबवर टाकत असल्याने जास्त लाईक मिळाल्यास तिकडून मानधन मिळविण्याच्या ते प्रयत्नात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अशा विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना केंद्रस्थानी घेऊन संबंधित शाळांना अनुदान देण्याचे काम करावे. हात मजूर किंवा ज्यांना कामच नाही, अशा कामगारांना शासनाने मोफत रेशन द्वारा धान्य उपलब्ध करून दिले. त्या स्वरुपात विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना काहीच मिळत नसल्याने खूप मोठा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तात्काळ वेतन मिळावे यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक राकेश विसपुते यांनी केली आहे.
शिक्षक करताहेत शेती व रंगकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:05 PM