चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव शिक्षण संस्थेला १०९ वर्षांचा शैक्षणिक वारसा असून, शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी आ.बं. विद्यालयाची टुमदार इमारत याची साक्ष देते. याच इमारतीच्या दुरुस्तीसह रंगरंगोटीसाठी शाळेतील शिक्षकांनीच सत्पात्री दानाची ओंजळ रिती केली आहे. याच दानमुठीतून शतकोत्तर वारसा असणाऱ्या इमारतीचे रुपडे पालटणार आहे.संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी इमारतीच्या दुरुस्तीसाठी शिक्षकांना साद घातली. प्रतिसाद म्हणून शिक्षकांनीही काही रक्कम देण्यास सुरुवात केली. सोमवारी नारायणदास अग्रवाल यांच्या उपस्थितीत शिक्षकांनी मदतीचे धनादेश सुपूर्द केले. या वेळी व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र चौधरी, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.एम.बी.पाटील, आ.बं.मुलींच्या विद्यालयाचे चेअरमन अॅड. प्रदीप अहिराराव, संचालक क.मा.राजपूत आदी उपस्थित होते.शिक्षकांचा ज्ञानयज्ञनारायणदास अग्रवाल यांनी संस्थेची शतकोत्तर वाटचाल शिक्षक सहविचार सभेत मांडतानाच शिक्षकांना इमारतीच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. ‘विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक मानबिंदू’ हे चाळीसगाव शिक्षण संस्थेचे ब्रीद. अग्रवाल व संचालक मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना निवृत्त मुख्याध्यापक उ.भ.काळे, निरखे, मिलिंद देव, प्रमोद येवले, गुलाब बोरसे, के.एन.तडवी, एम.जे. सूर्यवंशी, प्रताप ठाकूर, क्षीरसागर, विद्या सांगळे, व्ही.बी.देवरे, दिलीप जैन, एन.बी.झोपे, रामसिंग राजपूत, शिंदे, भिकन महाजन, अलका शहा आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी मदतीचे धनादेश दिले.गेल्या ४५ वर्षांपासून संस्थेशी निगडित आहे. आ.बं. विद्यालयाची १०० वर्षांपूर्वीची इमारत आम्हाला ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करायची आहे. याच भावनेतून इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे. शिक्षकांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येऊन चांगला आदर्श घालून दिला आहे.- नारायणदास अग्रवालअध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, चाळीसगाव शिक्षण संस्था, जि.जळगाव
शाळेच्या विकासाठी शिक्षकांची ‘दानमूठ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 4:53 PM