जामनेर : तालुक्यातील ढालगाव येथील जि.प.उर्दू मुलांच्या शाळेतील तिनही शिक्षकांची आॅनलाईन बदली झाल्याने संतप्त पालकांच्या रोषाला सामोरे गेलेल्या शिक्षण विभागाने पाच शिक्षकांची शाळेत नियुक्ती केली होती. मात्र नियुक्तीला तिघांनी केराची टोपली दाखविली तर रुजू झालेल्या शिक्षकावर आठ वर्गांचा भार आहे.सोमवार पर्यंत शिक्षक रुजू न झाल्यास मंगळवारी जामनेरच्या पंचायत समितीत शाळा भरविण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी जाहीर केला आहे. शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी १७ जून रोजी तालुक्यातील ढालगाव शाळेत एकही शिक्षक हजर न राहिल्याने मंगळवारी पालकांनी विद्यार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठत आवारातच ठिय्या मांडला होता.आवारात भरलेल्या शाळेसमोर गट शिक्षणाधिकारी आदिनाथ वाडकर यांनी बदली झालेल्या तिनही शिक्षकांसह आणखी एकाची नियुक्ती करीत असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र दोनच शिक्षक शाळेत रुजू झाले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.पाच शाळेत शिक्षकच नाहीतालुक्यात उर्दू शाळांमध्ये शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याची ओरड पालक करतात. मेणगाव , गोद्री, कसबा पिंपरी, ढालगाव, सामरोद या शाळेत एकही शिक्षक नसल्याची माहिती मिळाली. शिक्षण विभागाने याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली आहे. शिक्षण विभागाने तातडीने रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्याची मागणी होत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.तालुक्यात उर्दू शाळा ३२, रिक्त जागा- मुख्याध्यापक- ५, उपशिक्षक ३८, पदवीधर शिक्षक ५.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदरम्यान, शिक्षण विभागाने आदेश देऊन आणि तीन शिक्षकांची ढालगाव शाळेत बदली होऊनही शिक्षक शाळेवर हजर झाले नाहीत.त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तातडीने शिक्षक देण्याची मागणी ढालगाव येथील पालकांनी केली आहे. अन्यथा मंगळवारी पं.स.कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा दिला आहे.
ढालगाव शाळेत शिक्षक गेलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 6:54 PM