चाळीसगाव, जि.जळगाव : निवडणुकीच्या मतदार याद्या तयार करण्याचे काम नाकारले म्हणून चाळीसगाव तालुक्यातील १३ शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्याने याविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शनिवारी उपसभापती संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. तहसिलदारांविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.सद्य:स्थितीत भारत सरकाराच्या निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या दुरुस्तीचे काम सुरू असून, शिक्षकांना बीएलओंचे काम दिले जात आहे. तालुक्यातील १३ शिक्षकांनी हे काम नाकारताना तहसिलदारांसह तलाठी यांनादेखील उडवाउडवीचे उत्तरे दिली. यानंतर स्वत: तहसीलदार कैलास देवरे यांनी शहर, ग्रामीण व मेहुणबारे पोलिस स्थानकात गुन्हे नोंदविले. यामुळे शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली.एकीकडे शिक्षण विभागाचे शिक्षकांवर असणारे दबावाचे सत्र तर दुसरीकडे अतिरीक्त कामे अशा कात्रीत शिक्षक सापडले आहेत. तहसिलदारांनी अगोदर नोटीस देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी थेट गुन्हे नोंदविले. याविरोधात शिक्षक संघटना संतप्त झाल्या आहेत.निवेदनावर विद्या मोरे, शंकरसिंग राजपूत, देवसिंग परदेशी, भगवान हाडपे, सुनील कोतकर, कल्पना वाणी, गोविंद राजपूत, रमेश पवार, संभाजी गोसावी, मनोज पाटील, सचिन पाटील, सुनील कोठावदे, दिगंबर राजपूत, श्रीकृष्ण अहिरे, रामदास बागुल, सदाशिव पाटील, संजय देसले, वसंतराव चौधरी, सूर्यकांत पाटील, प्रदीप वाघ, दिलीप देशमुख, भालचंद्र सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिक्षकांवर गुन्हे दाखल झाल्याने शिक्षक संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:14 AM