जळगाव - जामनेर तालुक्यातील ढालगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षक हजर न झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालकांनी गुरुवारी शाळेला कुलुप ठोकले. यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन पालक जिल्हा परिषदेत पोहचले आणि तिथेच आता शाळा भरली आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना शाळेच्या पहिल्याच दिवशी या शाळेत शिक्षक न आल्याने विद्यार्थ्यांना घेऊन पालक थेट जामनेर पंचायत समितीमध्ये पोहचले होते व तेथेच शाळा भरविली होती. त्यानंतर दोन शिक्षक शाळेला मिळाले. मात्र गेल्या आठवड्यात शिक्षकांच्या पदोन्नती व बदली प्रक्रियेदरम्यान शिक्षकांच्या बदल्या झाल्या. यामध्ये या शाळेसाठी जे दोन शिक्षक मिळाले, ते अद्यापही हजर झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी गुरुवारी (४ जुलै) थेट शाळेला कुलुप ठोकले. त्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन ते जळगाव येथे जिल्हा परिषदेत पोहचले. आता तिथे शाळा भरली आहे.