आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३ : अभियंता होण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनला प्रवेश घेतला, तेथे धडे गिरवतांना वाईट मार्गाने जाणाºया मित्रांच्या संपर्कात राहून व्यसन जडले अन् या व्यसनासाठी पैसा लागणार असल्याने विद्यार्थ्याने थेट चोरीचाच मार्ग निवडल्याचे उघड झाले आहे. शासकीय वसतीगृहात ज्या मित्राने राहायला जागा दिली, त्याचाच ३८ हजार रुपयांचा कॅमेरा व अन्य साहित्य चोरणाºया दीपक अनिल अहेर (वय १९ रा.न्यायडोंगरी, ता.नांदगाव ) याला रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सौरभ सुनील पाटील (वय १९ रा.मोरगाव,ता.रावेर) हा विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतनला मेकॅनिकच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. वसतीगृहाच्या २०२ क्रमांकाच्या खोलीत तो वास्तव्य करीत आहे. दीपक अहेर हा विद्यार्थी देखील याच ठिकाणी शिक्षण घेत आहे. दोन विषयात नापास झाल्यामुळे त्याला प्रशासनाने वसतीगृहात राहण्यास परवानी दिलेली नव्हती, मात्र तरीही सौरभ याने बाहेर गावाचा विद्यार्थी असल्याने त्याला स्वत:च्या खोलीत राहायला जागा दिली. त्याचा गैरफायदा घेत दीपक याने २३ आॅक्टोबर रोजी सौरभ हा बाहेर गेल्याची संधी साधत दीपक याने दरवाजाचा कडीकोयंडा वाकवून कुलुप तोडले. त्यानंतर सौरभचा ३६ हजार ९९० रुपये किमतीचा कॅमेरा, ८०० रुपये किमतीचे पेनड्राईव्ह, मेमरीकार्ड असा ३८ हजार २९० रुपयांचा ऐवज चोरला होता.
डमी ग्राहक बनून रचला सापळा कॅमेरा चोरी झाल्यानंतर सौरभ याने शुक्रवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम यांनी चौकशी करण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला केल्या. त्यानुसार प्रदीप चौधरी व शरद पाटील यांना हा कॅमेरा दीपक याने चोरल्याची कुणकुण लागली. त्यानुसार खात्री करण्यासाठी सहायक फौजदार गोपाळ चौधरी, विलास शिंदे, विजय खैरे, अतुल पवार, ज्ञानेश्वर कोळी व सागर तडवी यांनी तंत्रनिकेतनमध्ये सापळा लावला. प्रदीप चौधरी यांनी कॅमेरा विकत घेण्यासाठी डमी ग्राहक पाठवून दीपक याला कॅमेरा आणायला लावला. वसतीगृहातून कॅमेरा आणताच पोलिसांनी त्याला पकडले.