- आकाश नेवेजळगाव - राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यावर महाजन यांना योग्य तो मानसन्मान दिला जात असल्याचे तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही महाजन यांच्या तक्रारी संपत नसल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनाच कुणी उमेदवारी करायची ते सांगा, त्याच्या नेतृत्त्वात आम्ही काम करु, तसेच मला सांगून टाका की, लढवायची की नाही.
ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली की, ‘तालुकाध्यक्ष कधीही धरणगावला बैठक घेत नाहीत. गुलाबराव देवकर यांनी जळगावला बैठक घेण्यास सांगितले, अशी सबब तालुकाध्यक्ष पुढे करतात. जळगाव तालुक्याचे अध्यक्ष आम्हाला बैठकीला बोलावत नाहीत. प्रमुख नेते असूनही सावत्र वागणूक मिळते. विधानसभा निवडणूक जाऊन तीन वर्षे झाली तरी बैठक झाली नाही. सगळं आलबेल असल्याचे दाखवले जात आहे. कुठल्याही नेमणुकांमध्ये विश्वासात घेतले जात नाही. त्यांनी पुढे जावे. मात्र, आम्हाला मान मिळावा. आम्ही नऊ जण विधानसभेला इच्छुक होतो. त्यांची एकत्र बैठक घ्यावी. गेल्या निवडणुकीत मते कमी का मिळाली, हेदेखील कळायला हवे.’
यावर तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी खुलासा करतांना सांगितले की, ‘त्यांना बैठकीला बोलावले जाते. बहुतेक बैठका धरणगावला होतात. जळगाव ग्रामीण मतदारसंघ असल्याने काही बैठका जळगावला होतात.’ जयंत पाटील यांनी काही बैठका धरणगावला घेण्याची आणि सर्व नऊ इच्छुकांना बोलावण्याची सूचना केली.
नंतर गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, मी सर्व इच्छुकांना सन्मान दिला आहे. जळगाव तालुक्यात महाजन यांनी स्वत: फिरायला हवे. हा विनाकारण ताण आहे. काम करायचे असेल तर मला एकदा सांगून टाका, की कुणी उमेदवारी करायची आहे. त्याच्या नेतृत्त्वात आम्ही काम करू. ही आडकाठी केली जाते. मला सांगून टाका, की लढवायची की नाही. पुढे जाता येईल.’
त्यानंतर जयंत पाटील यांनी हस्तक्षेप करत म्हटले की,‘तालुकाध्यक्षांनी सगळ्यांना बोलावले पाहिजे, कार्यरत नेत्यांना आधीच निरोप देत चला.’