लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव :जळगावात शुक्रवारी तापमान ४५.८ इतके पोहचले. दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असल्याने या रणरणत्या उन्हाचा तडाखा अनेकांना बसू शकतो. यासाठी खबरदारीच्या उपाययोजना महापालिकेने शहरात तीन ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू केला आहे.
उष्माघात झालेल्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने आधी शिवाजी नगरात दादासाहेब भिकमचंद जैन रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु केला होता. आता शाहू नगरातील शाहू महाराज रुग्णालय व सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालयातही हे कक्ष सुरु करण्यात आल्याची माहिती प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ.राम रामरावलानी यांनी दिली. अजून एकही रुग्ण या कक्षात दाखल नसला तरी तापमानाचा पारा पाहता खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात आल्याचे डॉ.रावलानी यांनी सांगितले.