ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24- उत्तर भारतातील थंड वा:यामुळे राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून जळगावचा पारा 9.4 अंशावर आला आहे. थंडीसोबतच पहाटे धुके पडत असल्याने शहर व परिसरातील रस्ते धुक्यात हरविल्याचा आभास होत आहे. यामुळे वाहनधारकांना दिवस उजाडल्यानंतरही दिवे लावून वाहने चालवावी लागत आहे.
डिसेंबर महिना लागला तरी यंदा पाहिजे तशी थंडी नव्हती. मात्र गेल्या सहा दिवसांपासून शहर व परिसरात थंडी चांगलीच वाढू लागली आहे. शनिवारी 9.4 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात आणखी घट होऊन काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दिवसागणिक रात्रीचा पारा घसरत असून बुधवारी 12.6 अंशावर असलेला पारा गुरुवारी आणखी खाली येऊन एकाच दिवसात 2.6 अंशाने तापमानात घट झाली व गुरुवारीही 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानात सातत्याने घट होत आहे. पारा घसरल्याने थंडीचा कडाका वाढला असून रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकासाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
धुक्यातून मार्गवाढत्या थंडीमुळे पहाटे मोठय़ा प्रमाणात धुके पडत आहे. शहर व परिसरातील ममुराबाद, शिरसोली, आव्हाने रस्त्यासह महामार्गावर धुक्यामुळे वाहनांना सकाळीही दिवे लाऊन मार्ग काढावा लागत आहे.