जळगाव :तापमानाचा पारा चढत चालला आहे. बुधवारी शहराच्या तापमानाची ४१.०६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. अशा या तीव्र उन्हात उष्माघाताचा धोका वाढत असून दुर्लक्ष केल्यास कित्येकदा रुग्णाचा जीव सुद्धा जातो. हीच बाब लक्षात घेत येथील महापालिकेच्या आरोग्य विभागाने शिवाजी नगरातील कै.दादासाहेब भिकमचंद रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार केला आहे. सर्व व्यवस्था असलेला उष्माघात कक्ष औषध व अन्य सोयींनी सज्ज आहे.
जळगावचे तापमान राज्यात सर्वात जास्त असून सूर्य आतापासूनच आग ओकताना दिसत आहे. बुधवारी (दि.१२) रोजी शहराचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसवर गेले होते व या तीव्र उन्हामुळे आता कुलर व पंखेसुद्धा फेल ठरत आहेत. उन्हाची तीव्रता पाहता लोकांना घराबाहेर पडताना विचारच करावा लागत आहे. मात्र, कामामुळे घरात राहणे शक्य नसून बाहेर पडावेच लागते. येथेच उष्माघाताचा धोका संभवतो. सातत्याने वाढत चाललेले तापमान व त्यामुळे निर्माण होत असलेला उष्माघाताचा धोका बघता मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड व प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी उष्माघात कक्ष तयार करण्याचा निर्णय घेऊन तो सुरुही केला आहे. या कक्षात सध्या तरी एकही रुग्ण नाही.
उन्हाची तीव्रता बघता नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळावे. सतत कुलर किंवा एसीच्या हवेत बसू नये. भरपूर पाणी प्यावे व त्यातही फ्रिजच्या पाण्याऐवजी माठाचे पाणी प्यावे. पांढरे सुती व सैल कपडे घालावेत. काही त्रास असल्यास दुर्लक्ष न करता लगेच सरकारी किंवा जवळील रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ.राम रावलानी केले आहे.