जळगाव : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असून, आता आगामी आठवडाभर तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच आहे. त्यात जिल्ह्यातून ५ ऑक्टोबरनंतर मान्सूनदेखील माघारी फिरणार असल्याने आता जिल्ह्यातील पावसाळा जवळपास संपला आहे. दरम्यान, आगामी काही दिवस आता तापमानात वाढ होऊन उकाडा वाढणार आहे.
मान्सून जसजसा माघार घेतो तसतसे तापमान वाढते आणि आर्द्रता कमी होते. हा परिणाम ऑक्टोबर महिन्यात दिसून येणार असून, आगामी काही दिवसांत शहरातील तापमानाचा पारा ३५ अंशाचा पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तापमानाच्या वाढीसह उकाडादेखील वाढणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवस जळगावकरांना घामाच्या धारा लावणारे ठरणार आहेत. आगामी काही दिवसांत बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रातदेखील कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे.
मात्र, यामुळे जळगाव जिल्ह्यात पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे छत्तीसगड व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. आगामी काळात जळगाव जिल्ह्यात मात्र पाऊस होण्याची शक्यता कमी आहे.
हिवाळ्याचे लवकरच होणार आगमन
यंदा हिमालयासह उत्तर भारतातून मान्सून लवकरच माघारी फिरला आहे. त्यामुळे हिमालयातील काही राज्यांमध्ये लवकरच बर्फवृष्टीला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय होऊन हिवाळ्याचे आगमन होऊ शकते. दरम्यान, जर बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात यंदा वादळांची स्थिती निर्माण झाली नाही, तर यंदा थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.