कोरोना परिणाम : सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे यंदा मार्च महिन्यापासून पुन्हा शहरातील विविध मंदिरे बंद असल्यामुळे, या मंदिरांवर अवलंबून असलेल्या पूजा-साहित्य व फुले विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दैनंदिन येणारे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्यामुळे विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने इतर घटकांप्रमाणे आम्हालाही आर्थिक मदत करावी, अशी मागणी शहरातील विविध मंदिराभोवती पूजा-साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी केली आहे.
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शासनाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे, मज्जीद व ख्रिश्चन बांधवांची प्रार्थना स्थळे बंद ठेवली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ही मंदिरे बंद आहेत. फक्त पूजाविधीसाठीच मंदिरे उघडण्यात येत असून, नागरिकांना दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे मंदिरे बंद ठेवण्यात आल्यामुळे पूजासाहित्य व फूल विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. जळगाव शहरातील ओंकारेश्वर महादेव मंदिर, ग्रामदैवत श्रीराममंदिर, श्री चिमुकले राममंदिर, भवानी माता मंदिर, कालिका माता मंदिर, इच्छादेवी माता मंदिर या ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या समोर पूजा-साहित्य व फुले विक्रेत्यांसह सात ते आठ दुकाने लागत असतात. वर्षानुवर्षे येथील विक्रेत्यांचा या व्यवसायावरच आपला उदरनिर्वाह सुरू आहे. सण-उत्सवाच्या काळात या विक्रेत्यांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने परिणामी या विक्रेत्यांचा व्यवसाय ठप्प असल्याने या विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
इन्फो :
कोरोनामुळे गेल्यावर्षी दुकाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. आताही दोन महिन्यांपासून दुकान बंद असल्याने घर कसे चालवावे, असा प्रश्न पडला आहे. तरी सरकारने इतर घटकांप्रमाणे आम्हालाही आर्थिक मदत करावी.
गोकुळ माळी, पूजा साहित्य विक्रेता
शासनाने सध्या संचारबंदीच्या काळात इतर घटकांना ज्या प्रकारे आर्थिक मदत केली, त्यानुसार आम्हालाही मदत करावी, सध्या मंदिरे बंद असल्याने पूजा-साहित्य व फुले विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मीनाक्षी माळी, पूजा-साहित्य विक्रेत्या