जळगाव : ग्रामपंचायत निवडणुका निर्भयपणे व शांततेत पार पाडण्यासाठी उपद्रवी असलेल्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (२) नुसार आपत्कालिन परिस्थितीत तातडीने दोन दिवसासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी पोलीस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीत दिले.येत्या १५ जानेवारी रोजी जिल्ह्यात ७२३ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक झाली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सचिन गोरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सकाळी १०.३० वाजता सुरु झालेली बैठक दुपारी २ वाजता संपली. यावेळी गुन्ह्यांचाही आढावा घेण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावपातळीवर उपद्रवी व्यक्ती असतात. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच्या निवडणुकात कुणी काय गुन्हा केला आहे. कोणाविरुध्द गुन्हा, अदखलपात्र गुन्हा दाखल असेल किंवा तक्रारी आलेल्या असतील तर अशा व्यक्तींचे रेकॉर्ड तयार करावे. सरकारी यंत्रणेशी हुज्जत घालण्याचेही प्रकार यापूर्वी घडल्याबाबत रेकॉर्ड असेल, त्याबाबतची माहिती पोलीस पाटलांकडून संकलित करावी, अशा व्यक्तींवर विशेष नजर ठेवावी व गरज पडल्यास आपत्कालीन परिस्थितीचे अधिकार वापरुन संशयितांना मतदानाच्या आदल्या दिवसापासून तर मतदान होईपर्यंत तात्पुरते हद्दपार करावे. त्यांचा प्रस्ताव तयार करुन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशा सूचना डॉ.मुंढे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, उघड न झालेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त करुन तातडीने हे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश त्यांनी दिले.