लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जळगाव ते चाळीसगाव हा १०४ किमीचा रस्ता तयार करण्याचे काम २०१७ पासून सुरू करण्यात आले होते. मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. यात १२ किमीचा रस्ता तयार करणे अजून बाकी आहे. हे काम जळगाव आणि पाचोरा विभागातील भूसंपादनाअभावी राहिले आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे.
इच्छादेवी चौफुलीपासून ४ किमीचे अंतर वगळले
शहरातील इच्छादेवी चौफुली ते चाळीसगाव हे अंतर १०८ किमीचे आहे. मात्र इच्छादेवी चौफुलीपासून चार किमीचे अंतर सोडून दिले गेले आणि त्यापुढे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. अजिंठा चौफुलीपासून औरंगाबाद महामार्गाचे काम होत असताना केवळ या महामार्गाचेच शहरातील अंतर का वगळले? कोणासाठी वगळले? असा सवाल उपस्थित होत आहे. हा रस्ता आता नव्याने तयार करण्यात आला आहे. मात्र तरीही त्यात १२ किमीचे काम अद्याप बाकी आहे. त्यासाठी जळगाव तालुका आणि पाचोरा तालुक्यातील काही गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण असल्याने हे काम रखडल्याची माहिती समोर आली आहे. जळगावच्या प्रांताधिकाऱ्यांनी या कामासाठी १५ दिवस आधीच जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती. त्यानुसार आता भूसंपादन केले जाणार आहे.
शहरातून पाचोरा रस्त्यावरून जाणाऱ्या या रस्त्याचे उरलेले काम लवकर पूर्ण करण्याची मागणी पाचोरा आणि जळगाव तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे. हे काम लवकर मार्गी लागल्यास त्यांचा जळगावचा प्रवास सुखकर होईल. जळगाव ते वावडदा या मध्ये देखील काही मोजक्या ठिकाणी हे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे तालुकावासीय हैराण झाले आहे.
इच्छादेवी चौफुलीपासूनच रस्ता करण्याची मागणी
शहरातील इच्छादेवी चौफुलीपासून चार किमी अंतराचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातच सोडून दिला होता. त्यातील दोन किमीचे अंतर हे जळगाव शहराच्याच हद्दीत येते. त्यामुळे मोहाडी फाटा, गायत्री नगर आणि मेहरूण तलावाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. इच्छादेवी ते मोहाडी फाटा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
आकडेवारी
रस्ता टप्पा १ जळगाव ते पाचोरा अंतर ५२ किमी खर्च - २२८ कोटी
टप्पा २ पाचोरा ते चाळीसगाव अंतर ४८ किमी खर्च २१० कोटी
काम बाकी
जळगाव ते पाचोरा - ९.२५ किमी
पाचोरा ते चाळीसगाव ३ किमी