वासेफ पटेल, भुसावळ (जि. जळगाव): मुंबई- नाशिक रेल्वे मार्गावरील कसारानजीक नाशिककडे जाणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यात दहा गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
रविवारी संध्याकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे- क्र. १२१११ मुंबई- अमरावती व क्र. १२१०५ मुंबई- गोंदिया एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या कल्याण, पुणे, दौंड, मनमाडमार्गे जळगाव व भुसावळकडे येतील. क्र. १२१३७ मुंबई- फिरोजपूर पंजाब मेल, क्र. १२२८९ मुंबई- नागपूर दुरांतो, क्र. १२८०९ मुंबई- हावडा एक्स्प्रेस, क्र. १२३२२ मुंबई- हावडा एक्स्प्रेस, क्र. १८०२९ एलटीटी- शालिमार एक्स्प्रेस, क्र. १२१६७ एलटीटी - वाराणसी एक्स्प्रेस आणि क्र. १२१४१ एलटीटी - पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्या दिवा, वसई, उधना, जळगाव आणि भुसावळमार्गे पुढे मार्गस्थ होतील, तसेच क्र. १७०५७ मुंबई- सिंकदराबाद एक्स्प्रेस ही गाडी कल्याण, कर्जत, पुणे, दौंड, मनमाड, जळगाव, भुसावळमार्गे पुढे रवाना होईल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.