जळगाव - शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत जात असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपा प्रशासनाकडून कुत्र्यांवरील निर्बीजीकरणासाठी निविदा काढण्यात आली आहे. मार्च महिन्यात देखील महापालिकेने चार वेळा निविदा काढून देखील निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने आपल्या अटी व शर्ती मध्ये बदल करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवली आहे. १० जूनपर्यंत या निविदा मागवण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.
मनपाकडून सहा दुकाने सील
जळगाव -शहरात जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावले असताना देखील अनेक अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकाने सुरू असल्याने, सोमवारी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने सहा दुकाने सील केली आहेत. यामध्ये कपड्यांच्या दुकानांचा समावेश आहे.
कुबेर यांच्या लिखाणाचा निषेध
जळगाव : लेखक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह लिखाणाबाबत माजी उपमहापौर सुनील खडके यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. कुबेर यांनी या आक्षेपार्ह लिखाणाबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी खडके यांनी केली असून याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निखिल पाटील, मिराज सोनवणे, हर्षल पाटील, सोहम खडके आदी उपस्थित होते.