लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, शहरातील प्रत्येक भागात नागरिकांकडून रस्त्यांच्या समस्यांबाबत ओरड सुरु आहे. तसेच विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले जात आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी आता नवीन रस्त्यांच्या कामासाठी तयारी सुरु केली आहे. मनपा फंडातून ४६ कोटींची तरतूद केली आहे. तसेच महासभेची परवानगी घेवून निविदेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात निविदा प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती मनपा बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अरविंद भोसले यांनी ‘लोकमत’ ला दिली.
शहरात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून शहरात नवीन रस्त्यांचा कामाला ब्रेक लागला आहे. त्यात मनपाकडून रस्त्यांची दुरुस्ती देखील थांबली असल्याने रस्त्यांची समस्या अधिकच बिकट होत आहे. शहरात धुळ, खड्डे यामुळे नागरिक त्रासले असून, लोकप्रतिनिधींना आता धारेवर धरले जात आहे. ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमात देखील उपमहापौरांसह सत्ताधाऱ्यांना नागरिक धारेवर धरत आहेत. तसेच रविवारी झालेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात देखील नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना रस्त्याच्या समस्यांवरुन धारेवर धरले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांनी ज्या भागात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. तसेच भुयारी गटार याजनेचे काम पुढील टप्प्यात आहे. अशा भागाचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार हे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
१०० कोटींसाठी सत्ताधारी न्यायालयात तर विरोधक मंत्रालयात
१. शहराच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र, वर्षभरात मनपातील सत्ताधाऱ्यांना या निधीचे नियोजन देखील करता आले नव्हते. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निधीवर विद्यमान शासनाने स्थगिती आणली आहे.
२. निधी थांबल्याने शहरातील रस्त्यांचे काम देखील थांबले आहे. आता या निधीसाठी सत्ताधारी व विरोधकांकडून देखील पाठपुरावा सुरु झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी या निधीवरील स्थगिती उठावी म्हणून न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासाठी महासभेत ठराव देखील करण्यात आला आहे. तर विरोधकांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून १०० कोटींच्या निधीवर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे.
३. ही स्थगिती उठविण्यासाठी नवीन कामांचा नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याची माहिती मनपा विरोधी पक्षनेत्यांनी दिली होती. आता या निधीवरील स्थगिती उठविण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र, या स्पर्धेत शहरातील प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.