संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटल्याप्रमाणे
“आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी” असा उल्लेख आढळतो. पंढरपूर आणि काशीविश्वेश्वर ही दोनच तीर्थक्षेत्रे अशी आहेत की जी कधीही नाश पावणार नाहीत अशी मान्यता आहे.
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा।।
त्यामुळेच आषाढी एकादशीला खूपच महत्त्व आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला वारकरी पंढरपुरात येतात आणि ही पंरपरा हजार वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. वारीची परंपरा संत ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते. माझ्या सद्गुरूंनी म्हणजे निवृत्तिनाथांनी माझ्या डोळ्यांत कृष्णांजन घालून पंढरीचा सोज्वळ मार्ग मला दाखविला.
श्रीगुरू निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ।
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल दीनांचा दयाळ।।
पंढरीच्या वारीची परंपरा संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान् पिढ्या चालू होती. विश्वंभरबाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष हे नित्यनेमाने पंढरीची वारी करीत असे तुकोबाराय अभिमानाने सांगतात,
‘पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत’
पंढरीच्या वारीत व वारी झाल्यावर जेव्हा वारकरी, संतमहात्मे एकत्र येतात तेव्हा प्रत्येक जण एकमेकांच्या चरणावर डोके ठेवून एकमेकांबद्दल असणारा आदर व्यक्त करतो. त्यामुळे आजही आपल्याकडे थोरा-मोठ्यांच्या पाया पडण्याची परंपरा कायम आहे. पायावर डोके ठेवल्याने दोघांचेही तेज वाढून अंगात असणारा मीपणा, अहंकार आणि ताठा कमी होतो असे म्हटले जाते. ईश्वर हा चराचरात आहे ही भावना अधिक बळावते.
पंढरीच्या लोकां नाही अभिमान । पायां पडती जन एकमेकां ।।
वारकऱ्याला वारी चुकल्याचं शल्य, दु:ख आहे आणि हे दु:ख ते फक्त पांडुरंगालाच सांगतील, अशा विरहाचं वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे आणि या परिस्थितीला ते लागू आहे.
ज्याचिये आवडी संसार त्याजिला... तेणें कां अबोला धरिला गें मायें
या विरहणीतून संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात - “ हे पांडुरंगा ! तुमच्या आवडी-प्रेमासाठी सर्व संसार सोडला, घरदार सोडलं तरी तुम्हीच आमच्याशी अबोला का धरला?”
या माऊलींच्या अभंगाप्रमाणे अस्सल वारकरी श्री पांडुरंगाला विचारतात, “हे मायबाप पांडुरंगा! आम्ही मुलं-बाळं, संसार सोडून तुमच्या वारीला येतो, दर्शनाला येतो, तुम्हाला भेटण्यासाठी येतो, आमचं काय चुकलं की, तुम्ही आमच्याशी अबोला धरलास ! व आमची वारी चुकविलीस! कारण काहीही असो, कर्ते-करविते तुम्हीच आहात, तुमच्या इच्छेने सर्व होतं. तुम्हीच गीतेत सांगितलं आहे ना!
सर्व सृष्टी तुमच्या सत्तेने चालते, त्रिभुवनाचे चालक-मालक तुम्ही आहात, सर्व कार्यकारणांचे मूळ तुम्ही आहात, असे असताना ही वेळ आम्हा वारकऱ्यांवर का आली? वारी तुम्हीच सुरू केली, तुम्हीच संत नामदेव महाराजांना सांगितलं आहे.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग।
अशा प्रकारचं प्रेमाचं भांडण वारकरी, पांडुरंगाशी करतो. पांडुरंगाची भेट न झाल्याने, अशी विरह अवस्था सद्य परिस्थितीत वारकऱ्यांची आहे.
असे असले तरी, वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञानही विशाल आहे. वारकऱ्यांसाठी पांडुरंग सर्वत्र आहे.
-डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता. धरणगाव.