मृतदेह घेण्यास नकार : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
जळगाव : अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे अरुण रामकृष्ण वाघ (४२,रा. लोहारखेडा, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ऑर्किड हॉस्पिटलमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, डॉक्टरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेऊन नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले होते. दिवसभराच्या घडामोडी व पालकमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने मात्र आरोपांचे खंडन केले आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण वाघ यांना १३ एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर १ मे रोजी कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता या विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नव्हते. त्याच काळात त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांना बोलावण्यात आले तेव्हा ते मयत झालेले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच वाघ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे शालक सुनील विक्रम पवार (रा.वावडदा) यांनी केला आहे.
*पोलीस ठाण्यात एक तास चर्चा*
वाघ यांचा मृत्यू झाल्यानंतर सुनील विक्रम पवार व शिवसेनेचे रवींद्र कापडणे (रा. वावडदा) यांच्यासह नातेवाईकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणून त्यांनी मागणी केली. पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्या दालनात तासभर चर्चा झाली, मात्र कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप कापडणे व पवार यांनी केला. शेवटी संध्याकाळी रवींद्र कापडणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. गुरुवारी याबाबत निर्णय घेऊ असे ठरवल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.
कोट...
अतिदक्षता विभाग मोठा आहे. त्यामुळे डॉक्टर व स्टाफ प्रत्येक रुग्णाकडे जात असतात. काही सेकंदच फक्त तेथे कोणी नव्हते आणि त्याच वेळी नातेवाईक तेथे आले. दुर्दैवाने ही घटना घडली. मात्र त्यात डॉक्टरांचा काही दोष नाही.
- डॉ. प्रशांत बोरोले, ऑर्किड हॉस्पिटल
कोट.....
मेहुण्याची तब्येत अतिशय ठणठणीत झालेली होती. दुपारी अतिदक्षता विभागात एकही डॉक्टर व कर्मचारी नसल्याने त्याच वेळेस त्यांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा कमी झाला की काय माहिती नाही, मात्र त्यांच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी.
- सुनील विक्रम पवार, मयताचे शालक