जळगाव- मोबाईलवर वादग्रस्त स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून तालुक्यातील शिरसोली प्र.न.येथे दोन गटात दगडफेक होऊन तणाव निर्माण झाल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजता घडली. या घटनेमुळे गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गावातील काही तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व वादग्रस्त स्टेटस ठेवले. हा प्रकार दुसऱ्या गटातील तरुणांच्या लक्षात आल्याने वादाला तोंड फुटले. त्यामुळे बस स्थानक परिसरात दगडफेक झाली. यात चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला.
रात्री साडेबारा वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. दगडफेक करणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात होता. गावात रात्रभर दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे, याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात कोणतीही नोंद झाली नव्हती.