न्यायालयात वकिलांची फौज : वाद घालणाऱ्या वकिलांना काढले बाहेर
जळगाव : वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राजू सूर्यवंशी याचा जामीन रद्द करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ॲड. राजेश साहेबराव गवई (वय ५०,रा. जळगाव) या भुसावळ न्यायालयाच्या सरकारी वकिलाला जिल्हा सत्र न्यायालयाने दर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी व पंधरा हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर शनिवारी अंतरिम जामीन मंजूर केला.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी सरकारी वकील राजेश साहेबराव गवई यास आकाशवाणी चौकात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यास उप-अधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयात हजर केले असता, १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
मूळ जामीन अर्ज दाखल होऊन त्यावर निकाल येईपर्यंतच हा अंतरिम जामीन राहणार आहे, तसेच यादरम्यान संशयित ॲड. गवई यास आठवड्यातून एकदा बुधवारी १२ ते १ या वेळेत हजेरी लावावी लागणार आहे.
आरोपी अन् सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तीवाद
सरकारपक्षातर्फे ॲड. भारती खडसे यांनी जिल्हा न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. नाशिकच्या लाचलुचपत विभागाने रात्रीच हा तपास जळगाव विभागाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे जळगावच्या विभागाला तपासासाठी पुरेसा अवधी मिळावा, संशयिताने अशा पद्धतीने मालमत्ता जमविल्याची शक्यता असून, त्यांचे बँक खाते तपासण्यात यावे, यासाठी पाच दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान न्यायालयात वकिलांनी एकच गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्या.आर.जे. कटारिया यांनी वकिलांना न्यायालयात गर्दी करू नये सांगत न्यायालयाच्या बाहेर निघण्यास सांगितले.