जळगाव : भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष अनिल चौधरी यांचा बॉडीगार्ड केदारनाथ वामन सानप याने भुसावळप्रमाणेच जळगावात पिस्तूल काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रकरण अंगाशी येण्याचे चिन्हे दिसताच चौधरीसह सर्वांनी तडजोडीची भूमिका घेतली. पोलिसांनी मात्र या तडजोडीला कायद्याचा दणका देत सर्वांनाच कागदावर घेतले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने दोन दिवसानंतर शस्राचा गैरवापर व दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
महामार्गावरील खेडी शिवारातील हॉटेल न्यू पंजाब ढाब्यावर जेवण झाल्यानंतर अनिल चौधरी यांनी खुर्चीला लाथ मारून ती खुर्ची कुत्र्याला मारून फेकली. त्यावरून चौधरी व मुकेश दत्तात्रय माळी यांच्यात वाद झाल्याची घटना रविवारी रात्री पावणेअकरा वाजता घडली होती. मंगळवारी या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाब्यावर पिस्तूल काढणारा केदारनाथ सानप हा अनिल चौधरी यांचा अंगरक्षक (बॉडीगार्ड) आहे. त्याच्याकडे शस्र परवाना आहे. भुसावळ शहरात नेहमीच अशा घटना घडलेल्या असून, सानप याने यापूर्वीही अशाच प्रकारे भुसावळात दहशत निर्माण केली आहे, मात्र तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. जळगावातही तोच कित्ता गिरविण्यात आला, येथेही तक्रार द्यायला कोणीच पुढे आले नाही, त्यामुळे पोलिसांनीच फिर्याद दिली. अनिल चौधरी यांचे बंधू संतोष चौधरी आमदार असताना सानप हा चौधरी यांचा बॉडीगार्ड होता तर सोबत असलेले दुर्गेश ठाकूर हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. ठाकूर हा संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन चौधरी यांचा खास मित्र आहे. त्यामुळे चौधरींचा मानसपूत्र अशी ठाकूर यांची भुसावळात ओळख आहे.
दुसरीकडे मुकेश माळी हे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ असून, ते कंपन्या तसेच इतर उद्योगात कामगार पुरविण्याचे काम करतात. खेडी शिवारातील ढाब्यावर जेवणासाठी ते मित्रांसोबत नेहमीच जातात. गुन्हेगारी किंवा इतर राजकीय अशी त्यांची पार्श्वभूमी नाही. जेवणाला गेल्यामुळेच तेथे खुर्ची फेकल्याच्या कारणावरून वाद उफाळला. या वादानंतर जळगावचे नगरसेवक भगत बालाणी यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न करून तडजोड घडवून आणली. त्यानुसार दोघांनीही माघार घेतली; परंतु दहशतीचा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला अन् सर्वच जण कायद्याच्या रडारवर आले.
व्हिडिओ व्हायरल झाल्याने फुटली वाचा
रविवारी घडलेल्या या घटनेचा मंगळवारी व्हिडिओ व्हायरल झाला. त्याची दखल घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी खात्री करण्यासाठी उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपूत, किशोर पाटील, सचिन पाटील व मुकेश पाटील यांचे पथक पाठविले. या पथकाने घटनास्थळ, ढाबा मालक तुषार फकिरा बाविस्कर यांची चौकशी केली. ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चौधरी व माळी गट एकमेकांवर चालून येत असून, हाणामारी करताना दिसून येत आहेत. खुर्च्यांचीही तोडफोड झाली आहे. आवराआवर झाल्यानंतरही दोन्ही गट एकमेकांवर धावून येतात व परतीच्यावेळी एका जवळ पिस्तूल दिसून येत आहे. घटना घडल्याची खात्री व पुरावे मिळाल्यावर पोलीस कर्मचारी मुकेश पाटील यांनीच सरकारतर्फे फिर्याद दिली.
भगत बालाणी यांचा वाढदिवस
नगरसेवक भगत बालाणी यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यासाठी अनिल चौधरी यांनी त्यांना जेवण शुभेच्छा देण्यासाठी बोलावले होते. जेवण झाल्यानंतर हा राडा झाला. या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. हा व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.