लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रामेश्वर कॉलनी परिसरातील सिद्धार्थनगरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या लखन समाधान सपकाळे (वय २६, रा. सिद्धार्थनगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणाला रविवारी रात्री १०.३० वाजता एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
सिद्धार्थनगरात असलेल्या बांधाजवळ एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, सचिन पाटील आणि मुकेश पाटील यांनी लखन समाधान सपकाळे याला अटक केली. त्याच्याकडून २४ इंची लांबीची तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अंमलदार मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास इम्रान सय्यद करीत आहे.