जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या चेअरमन व संचालकांनी केलेल्या फसवणूक व अपहार प्रकरणात शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात तीन ठेवीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान, यावेळी चेअरमन प्रमोद रायसोनीसह सर्व संचालकांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
बीएचआर संस्थेच्या संचालक मंडळाने केलेल्या अपहार व फसवणूक प्रकरणात राज्यभरात ७५ गुन्हे दाखल आहेत या सर्व गुन्ह्यांची सुनावणी जळगाव न्यायालयात होत आहे. २०१५ मध्ये पाचोरा पोलीस ठाण्यात विजयसिंह पाटील यांच्या फिर्यादीवरून चेअरमन प्रमोद रायसोनीसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी या गुन्ह्यात फसवणूक झालेले युवराज पाटील, महेंद्र शहा व विष्णू पाटील या तीन ठेवीदारांची साक्ष शनिवारी नोंदविण्यात आली. युवराज पाटील यांचे २ लाख ८८ हजार, शहा यांचे १ लाख ५८ हजार तर विष्णू पाटील यांचे २ लाख ४ हजार संस्थेने परत दिले नाहीत. या तिघांनी आम्हाला संस्थेने पैसे परत केले नसल्याचे न्यायालयात सांगितले. पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे.