चाळीसगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी ४७ मराठा बांधवांनी प्राणांची आहुती दिली. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. राज्यातील ठाकरे सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. खरे म्हणजे ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे केली.
सोमवारी सायंकाळी सात वाजता राणे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी एकजुटीने आरक्षणसाठी मराठा समाजाने संघर्षासाठी तयार राहावे, असे आवाहनही केले. ठाकरे सरकारला सामोपचाराची भाषा समजत नाही. संभाजीराजे यांनी अत्यंत नम्रपणे संघर्षाची भूमिका मांडली. या सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आगामी काळात आरक्षणासाठी कोणत्याही संघर्ष आणि लढाईसाठी तयार राहा. रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी आमदार मंगेश चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
आंदोलनादरम्यान मराठा समाजबांधवांवर १३ हजार ७०० गुन्हे दाखल झाले आहेत. ते मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांनी तर आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजात नाराजी असल्याचे रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशीच मुस्लीम समाजाची भूमिका आहे, असे नगरसेवक चिराग शेख यांनी स्पष्ट केले. आरक्षणातील विविध तांत्रिक मुद्द्यांवर पंकज रणदिवे यांनी ऊहापोह केला.
या वेळी माजी जि.प. सदस्य शेषराव पाटील, सुधीर पाटील, के.बी. साळुंखे, संजय भास्कर पाटील, लक्ष्मण शिरसाट, संजय रतनसिंग पाटील, गणेश पवार, प्रदीप देसले, मानसिंग राजपुत, नितीन पाटील, अरुण अहिरे, सदानंद चौधरी, पंकज रणदिवे, खुशाल पाटील, जितेंद्र वाघ, विकास चौधरी, विजय पांगारे आदी उपस्थित होते.