वासेफ पटेल
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने मागील सात महिन्यांत घरातून पळून गेलेल्या ४७७ मुलांना वाचवून त्यांना त्यांच्या आई-वडिलांपर्यंत सुखरूप पोहोचविण्याचे कार्य केले आहे. रेल्वे स्टेशन परिसर, प्लॅटफॉर्म, रेल्वेत प्रवास करताना ही मुले सापडली. सापडलेल्या मुलांमध्ये ३१० मुले आणि १६७ मुली आहेत. आरपीएफ आणि चाइल्ड लाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ही मुले आपल्या आई-वडिलांपर्यंत पोहोचू शकली.
अशी सांगितली घरातून पळून जाण्याची कारणे
घरात आई-वडिलांची भांडणे होत असल्याने बऱ्याच अल्पवयीन बालकांनी घर सोडले, तर चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरची भूल पडून अभिनेता, अभिनेत्री, मॉडेलिंग करण्यासाठी अनेकांनी घरातून कुणालाही न सांगता निघून गेल्याचे सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाच्या प्रशिक्षित जवानांनी रेल्वेमध्ये तसेच प्लॅटफॉर्मवर, रेल्वे स्टेशनजवळ फिरत असताना या मुलांना शोधले. या मुलांच्या आई-वडिलांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सापडलेल्या बालकांचे समुपदेशन- अनिल लाहोटी
घरातून पळालेल्या मुलांची रेल्वेने समस्या जाणून घेतली आणि त्यांना त्यांच्या परिवारासोबत जाण्यासाठी समुपदेशन केले. ही एक सामाजिक जबाबदारी असल्याचे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांनी सांगितले. आरपीएफ आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्या कार्याची विशेष स्तुतीदेखील त्यांनी केली.
जानेवारी ते जुलैपर्यंत वाचविलेली मुले मंडळनुसार अशी
मुंबई मंडळ १६६ बालके यात १०४ मुले आणि ६२ मुली
भुसावळ मंडळ ७० बालके यात ३९ मुले आणि ३१ मुली
नागपूर मंडळ ४० बालके यात २२ मुले आणि १८ मुली
पुणे मंडळ १७१ बालके यात १३० मुले आणि ४१ मुली
सोलापूर मंडळ ३० बालके यात १५ मुले आणि १५ मुली
केवळ जुलै २०२१ मध्ये ७३ मुले (४७ मुले आणि २६ मुली) यांना वाचविले
काही घटना, प्रसंग असे
२४ जुलै २०२१ ड्युटीवर असलेले रेल्वे तिकीट निरीक्षक नरेंद्र मिश्रा यांनी कल्याण आणि लोकमान्य तिलक टर्मिनस यामधील ट्रेन नंबर ०३२०१ मधील एकटी प्रवास करणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सापडली. लोकमान्य तिलक टर्मिनस पोहोचल्यानंतर टीटीईनी महिला आरपीएफ पाटीदार आणि चाइल्ड लाइनच्या शारदा कांबळे यांच्याकडे त्या मुलीस सुपूर्द केले. बबलूकुमार यांना चाइल्ड लाइन स्टाफच्या उपस्थितीत त्या मुलीने आपले नाव शीतल असे सांगितले आणि ती पटना, बिहारमध्ये राहत असल्याचे सांगून मुंबईमध्ये मॉडलिंग अभिनेत्री बनण्यासाठी घरातून पळाल्याची माहिती दिली.
गीतांजली तेलगू बोलत होती...
बालसुधारगृह डोंगरीला चाइल्ड लाइन स्टाफ शारदा कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी पुढील कार्यवाही केली. दुसऱ्या एका घटनेत एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आईने ओरडल्यामुळे महबूबनगर, जि. आवास येथून घरातून पळून गेली. ती ट्रेन नंबर ०६५२४ निजामुद्दीन- यशवंतपूर एक्स्प्रेसने पुणे येथे आरपीएफ कॉन्स्टेबल शशिकांत जाधव आणि महिला कॉन्स्टेबल श्रीवास यांना १४ जुलै २०२१ ला हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर मिळाली. चौकशी केल्यानंतर मुलीने आपले नाव गीतांजली सांगितले. ती तेलगू बोलत होती. तिच्याद्वारे दिलेल्या नंबरवर संपर्क करून कार्यवाहीनंतर मुलीस स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द केले.