जळगाव: शासकीय मुलींचे आयटीआय ते जिल्हा उद्योग केंद्र यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ते पूर्ण होण्यास आणखी १० दिवस लागणार आहेत. या भागात नाल्याचे पाझरणारे पाणी आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण काही का असेना मात्र, नवीन रस्ता झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच मक्तेदाराला दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे.
महापालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासकीय मुलींचे आयटीआय ते जिल्हा उद्योग केंद्र या भागातील महामार्गाचा भराव मोठ्या प्रमाणात खचत असल्याचे लक्षात आले होते. त्याची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली; पण फायदा झाला नाही. दुरुस्ती केल्यावर पुढच्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा खड्डा तयार झालेला असायचा. दरवेळी वेगळा भाग खचलेला असायचा. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिंप्राळ्यातील दौऱ्यावेळी याच ठिकाणच्या खड्ड्यात एका मालवाहू वाहनाचे मागील चाक निखळले होते. त्यानंतर राजकीय पक्षांनी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.
एक्सकेवेटर, डम्पर आणले
मक्तेदाराने दि. एक ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे; पण यावेळी होणारे काम हे वेगळे आहे. आतापर्यंत पॅचवर्क केले जात होते, आता थेट महामार्ग खोदण्यात येत आहे. पुढील दीड दिवसात खोदाईचे काम संपलेले असेल. यादरम्यान २०० मीटर बाय ८ मीटर भागात ५ फूट खोलीपर्यंत डांबरीकरण, खडी, मुरूम व मातीचा संपूर्ण भराव काढण्यात येत आहे. त्यासाठी एक्सकेवेटर, डम्पर व इतर मशिनरी लावण्यात आली आहे.
आताचे काम असे होणार...
आधीचा सर्व भराव खोदून काढल्यावर रोलरने सपाटीकरण केले जाणार आहे. त्यावर मुरुमाचे ३, जाड खडी व बारीक खडीचा प्रत्येकी १, डांबर व खडीमिश्रित १ थर आणि सर्वांत शेवटी बारीक खडीचा १ थर दिला जाणार आहे. हे काम दि. १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी अंदाजित ४० लाख रुपये खर्च आहे, अशी माहिती साइट इंजिनिअर विशाल यादव यांनी दिली.
नाल्यातील पाण्याने गडबड केली...?
मुलींचे आयटीआयसमोर भराव खोदण्याचे काम सुरू असताना साडेतीन फुटांवर काही ठिकाणी ओल्या मातीचा थर लागला आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नाल्यातील पाणी पाझरत इथपर्यंत येत असावे. महामार्गाखालून पाण्याचा प्रवाह आणि वरून अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा अंदाज आहे.
वाहतूक कोंडी, प्रचंड धूळ
महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून, प्रचंड धूळही उडत आहे. जळगावकरांना आणखी दहा दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.