भूषण श्रीखंडे
जळगाव : राज्यातील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या व लाड पागे समितीप्रमाणे पूर्ववत सफाई कामगारांना वारसाहक्क मिळण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे यापूर्वी आंदोलन केले आहे; परंतु शासनाने याबाबत दखल घेतली नसल्याने मजदूर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबई येथील आझाद मैदानावर ३१ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिलीप चांगरे यांनी दिली.
याबाबत गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दिलीप चांगरे पुढे माहिती देताना म्हणाले की, यापूर्वी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी, आमदार, खासदारांच्या समक्ष धरणे आंदोलने केलेली आहेत. मुंबई आझाद मैदानावर ७ जूनला राज्याचे कामगारमंत्री दादासाहेब भुसे यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषण सोडवून तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्यातील सफाई कामगारांचा शासनावर असंतोष निर्माण झालेला आहे.
त्यामुळे ३० ऑक्टोबरपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास ३१ ऑक्टोबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर जोपर्यंत प्रलंबित १५ मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण केले जाणार असल्याची माहिती चांगरे यांनी दिली. पत्रकार परिषदेत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश सल्लागार अनिल तळेले, शहराध्यक्ष कुमोद चांगरे, शहर संघटक राजेंद्र नेवे उपस्थित होते.