विवेक चांदूरकर ,जळगाव : तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे पशूंच्या दवाखान्यात एक वर्षांपासून डाॅक्टर नाही. डाॅक्टरांना एफएमडी लसींचा पुरवठा करण्याची मागणी घेवून गेलेल्या पशूपालकांनी डाॅक्टर नसल्याने अखेर खुर्चीलाच १३ डिसेंबर रोजी निवेदन दिले.
जनावरांच्या फूट अॅन्ड माऊथ डिसीजची लस उपलब्ध करून देण्यासाठी पिंपळगाव काळे ग्रामस्थांच्या वतीने अतिरिक्त चार्ज असलेल्या पशु वैद्यकीय डॉक्टरांना अनेक दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले. वैद्यकीय दवाखान्यात पशूंच्या आरोग्यांसंबंधी लसी उपलब्ध नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाल्यामुळे गुराढोरांच्या तोंडाला पायाला फोड येतात व ताप सुद्धा येत आहे. यामुळे गुरेढोरे दगावण्याची शक्यता आहे. या रोगाला रोखण्यासाठी एफएमडी लस जनावरांना देण्यात येते. परंतु आद्यापही पिंपळगाव काळे पशु वैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध नसल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एफएमडी लस पशु वैद्यकीय दवाखाना पिंपळगाव काळे येथे तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्याकरिता पिंपळगाव काळे येथील ग्रामस्थ रूग्णालयात गेले होते. मात्र, वर्ष भरापासून दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. निवेदन घेण्याकरिता रूग्णालयात कुणीच जबाबदार अधिकारी व कर्मचारी नव्हता. त्यामुळे निवेदन दवाखान्यातील डॉक्टरांच्या खुर्चीला देण्यात आले.
पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कलमधील सर्वात मोठा पशु दवाखाना आहे. पंचवीस हजार लोकसंख्येच्या गावामध्ये गेले वर्षभरापासून डॉक्टर उपलब्ध नाहीत. डॉक्टर व औषधोपचार अभावी अनेक पशु दगावले आहे. विविध रोगांची लागण जनावरांना झाली आहे. पशुपालकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तरीही प्रशासनाने तात्काळ पशु वैदकीय दवाखान्यात डॉक्टर व औषधे उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा संबंधित विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भिसे यांनी दिला. निवेदन देतेवेळी, वासुदेव चोखंडे, शुभम पाटील, महेंद्र तायडे, ज्ञानेश्वर केदार, जगदीश चोखंडे, वैभव रायने, गोपाळ वासनकर, ओम ताठे आदी उपस्थित होते.