जळगाव - मराठा आरक्षणासाठी अमळनेर येथील चार समाजबांधवांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यातील प्रवीण संभाजी देशमुख आणि जयंत महेश पाटील या दोन जणांची प्रकृती गुरुवारी खालावली आहे.
प्रवीण देशमुख, सचिन निंबा वाघ, हर्षल अशोक जाधव आणि जयंत पाटील या चार जणांनी ३१ रोजीच्या रात्रीपासून अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यापैकी देशमुख आणि पाटील यांची प्रकृती गुरुवारी खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांची रक्तदाब तपासून इंजेक्शन दिले आहे.
भडगावला कडकडीत बंद
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी भडगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरुन तरुणांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यात युवकांनी मोठा सहभाग नोंदविला.
चाळीसगाव येथे गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
मराठा समाजाच्यावतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंदोलन मोडून काढत आहेत. आंदोलनकर्त्यांवर ते गंभीर गुन्हे दाखल करत असल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे गृहमंत्री फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.