कुंदन पाटील
जळगाव : चाळीसगावच्या तत्कालिन उपविभागीय अधिकाऱ्याने शासकीय योजनांना एका तंबूत आणले आणि कानाकोपऱ्यातल्या जनतेच्या पदरात योजनांचा लाभ टाकला. चाळीसगावमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यापाठोपाठ जामनेरांच्या दिमतीलाहा हा तंबू उभा राहिला. या तंबूने अनेकांना हात दिल्याचे उघड होताच राज्य शासनही या ‘मॉडेल’च्या प्रेमात पडले आणि हा प्रयोग राज्यभरात राबविण्याचे आदेश काढले.
२०१६ मध्ये चाळीसगावचे तत्कालिन उपविभागीय अधिकारी मनोज घोडे-पाटील यांनी जिल्ह्यात हा प्रयोग राबविला होता. त्यांनी महसुल विभागाचे महाशिबिर भरविले आणि त्यात चाळीसगाव तालुक्यातील १० हजार ग्रामस्थांना एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशासकीय सोय केली होती.
या महाशिबिराच्या माध्यमातून जनतेच्या प्रस्तावांना तालुका, उपविभागीय आणि जिल्हास्तरावरुन अत्यल्प कालावधीत मंजुरी मिळाली होती. त्यामुळे या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करण्यात आले होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर जळगावचे तत्कालिन उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी जामनेर गाठले आणि त्याठिकाणीही महाशिबीर घेतले होते. त्यानंतर भांडे यांची कल्याणला बदली झाली. हा प्रयोग कल्याणमध्येही राबविला गेला. त्याचीच दखल घेत शासनाने जळगावचे ‘मॉडेल’ची राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
कसे आहे मॉडेल?
काच छताखाली राज्य शासनाचे विविध विभाग एकत्रित आणले. आणि त्यांची बैठक घेतली. विविध योजनांसाठी अर्ज उपलब्ध करुन पात्र लाभार्थ्यांकरवी ते भरुन घेतले आणि ते प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठांकडे पाठविले गेले. अचूक व निर्दोष असणाऱ्या या प्रस्तावांना तत्काळ मंजुरी मिळाली. त्यामुळे चाळीसगावच्या हजारो लाभार्थ्यांमधील ‘शासकीय काम आणि थोडा थांब’चा समज पुसला गेला.
या उपक्रमाला चाळीसगाकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनीही महाशिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. म्हणून लाभार्थ्यांपर्यंत अल्पकालावधीतच योजना पोहचत्या करता आल्या.-मनोजकुमार घोडे-पाटील, उपायुक्त, मनपा, नाशिक.