जळगाव: काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर होत असलेल्या त्रासाला कंटाळून गाढोदा येथील प्रगतीशील शेतकरी तथा जळगाव शेतकी संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र सीताराम पाटील यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या रामचंद्र पाटील यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. बायपास शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम जाणवत होता.
आजारपणाच्या भीतीमुळे ते बैचेन झाले असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. बुधवारी त्यांनी गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. घरी येऊन पत्नी कमल पाटील यांना मंदिरात जाऊन येण्यास सांगितले. पत्नी मंदिरात गेल्यावर रामचंद्र पाटील यांनी घरात गळफास घेतला. पत्नी मंदिरातून घरी आल्यानंतर त्या मधल्या घरात गेल्या असता, त्यांना रामचंद्र पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी लागलीच शेजारच्यांना बोलावून घेतले. नातेवाइकांनी तातडीने रामचंद्र पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, रामचंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी कमल पाटील, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड, जावई, दोन भाऊ आहेत.