जळगाव : तालुक्यातील शिरसोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबात एकुलता एक असलेल्या मुलाला आपल्याप्रमाणेच कुशल इलेक्ट्रीशियन बनविण्याचे वडील विकास बारी यांचे स्वप्न अधुरेच राहिले. त्यांचा १९ वर्षीय मुलगा देवेंद्र याचा गुरुवारी (दि.१४) दुपारी, डेंग्यूमुळे मृत्यू झाला.
शिरसोली प्र. बो. येथील बारीनगरमधील पाण्याच्या टाकीजवळील रहिवासी विकास बारी हे खासगी इलेक्ट्रीशियन असून, त्यांनी आपल्या मुलालाही कुशल इलेक्ट्रीशियन बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी देवेंद्रला आयटीआयला प्रवेश देखील घेऊन दिला होता. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते. देवेंद्रला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ताप येत होता. सुरुवातीला गावातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी (दि.१४) त्याची प्राणज्योत मालवली. एकुलत्या एक तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. देवेंद्र याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.
दोन्ही गावात तापाचे रुग्ण
- शिरसोली प्र. बो. आणि प्र. न. या दोन गावात बरेच जण थंडी, ताप व मलेरियाने आजारी आहेत. आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. वैशाली फेगडे, डॉ. निलेश अग्रवाल, आरोग्य सेवक सलीम पिंजारी, अनिल महाजन, नंदू सपकाळे, प्रशांत चौधरी, प्रमोद रगडे यांच्यासह आशा वर्कर यांनी उपाययोजना म्हणून डास अळींचे सर्वेक्षण सुरू केले आहे.- सांडपाणी, पाणीसाठे आदींची तपासणी करून ग्रामपंचायतमार्फत दवंडीद्वारे सूचना देण्यात येऊन जनजागृती केली जात आहे. ताप असलेल्या रुग्णांनी जवळील आरोग्य केंद्र, रुग्णालय किंवा दवाखान्यात उपचार घेण्याचे आवाहन केले जात आहे. ॲबेटची फवारणीही करण्यात येत आहे.
डॉक्टर म्हणतात...
सध्या वातावरणातील बदलामुळे थंडी, तापाचे रुग्ण वाढले असून, उपाययोजना करण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे. कुणाला ताप आल्यास जवळील शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात.- डॉ. वैशाली फेगडे, वैद्यकीय अधिकारी
सध्या गालफुगी, सर्दी व खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असून, डेंग्यूबद्दल शंका असल्यास ताबडतोब इतर तपासणी करून घेण्यास रुग्णाला सांगतो.
- डॉ. सोपान पाटील