जळगाव : दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने विक्रांत संतोष मिश्रा (वय ११, रा.एकनाथ नगर) या सायकलस्वार बालकाला उडविले घटना रविवारी सायंकाळी चार वाजता मेहरुण तलावाकाठी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की चारचाकीच्या धडकेत विक्रांत चेंडूसारखा १५ फूट वर फेकला गेला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चारचाकी चालविणारा देखील १६ वर्षाचाच मुलगा आहे.
या घटनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टी असल्याने विक्रांत मिश्रा हा चुलत भाऊ सुनील जितेंद्र मिश्रा याच्यासोबत सायकलीने मेहरुण तलावाकडे फिरायला गेला होता. तेथे मास्टर कॉलनीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा कार घेऊन शिकण्यासाठी मेहरुण तलावाकाठी गेला होता. मित्राचीही कार या ठिकाणी होती. दोन्ही मुलांनी कारची शर्यत लावली. त्यात (क्र.एम.एच १९ बी.यू ६००६) रस्त्याच्याकडेला असलेल्या विक्रांतला जोरदार धडक दिली. त्यात विक्रांत चेंडूसारखा १५ फुट उंच व पुढे फेकला गेला. सायकल बाजुला फेकली गेली. डोक्याला मार लागल्यामुळे विक्रांतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे घाबरलेल्या चुलत भाऊ सुनीलने घरी फोन करुन माहिती दिली. आई, वडिलांनी मुलाचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला.घटना घडल्यानंतर जवळल्या नागरीकांनी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.
चौथीच्या वर्गात शिक्षण
विक्रांत हा मेहरुण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता.वडील संतोष गिरीजाशंकर मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात. आई रिचा गृहिणी आहे. एकुलता मुलगा गेल्याने दोघांना मोठा धक्का बसला.