जळगाव : राज्यातील शिंदे सरकारने दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करावेत, असे आदेश देऊनही जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र पगाराअभावी अंधारात जाणार आहे. या विभागात सण-उत्सावाआधी पगार न होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
दिवाळीपूर्वी २१ तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करावेत, अशी मागणी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेत सरकारने दिवाळीपूर्वीच पगार करण्याचे निर्देश सर्व खात्यांना दिले होते. पण या निर्णयाचा फायदा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना झाला नाही. निर्णय झाला, अनुदान आले, पण पगारच मिळाला नाही, अशी त्यांची अवस्था आहे. जि.प.च्या अन्य खात्यांचे पगार होतात पण आरोग्य विभागाचे का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवापूर्वी पगार करावेत, असे आदेश असताना त्यावेळीही पगाराला विलंब झाला होता. त्याची पुनरावृत्ती दिवाळीच्या तोंडावर झाली आहे. आरोग्य विभागातील पगार वेळेवर होत नसल्याचा मुद्दा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले होते. मात्र, त्यावर पाणी फिरले आहे.
राज्य सरकारने गुरुवारी अनुदान जमा केले. पण आरोग्य विभागात बिले तयार नव्हती. जिल्हा आरोग्य अधिकारी उपलब्ध नव्हते. शुक्रवारी ते आल्यावर पगार बिलावर सही झाली. बिल ट्रेझरीत जमा होऊन सीएमपी निघेपर्यंत बँकांची वेळ संपून गेली होती. त्यामुळे पगार झाला नाही, अशी माहिती मिळाली. शनिवार ते सोमवार बँकांना सुटी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
कर्मचाऱ्यांची अडचण
आरोग्य विभागात दोन ते अडीच हजार कर्मचारी आहेत. अनेकांची ग्रामीण भागात नियुक्ती आहे. कर्जाचे हप्ते भरावे लागतात. पण वेळेवर पगार होत नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक समस्या उभी राहत आहे. कधीही ठराविक तारखेला पगार होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
हे मुद्द कोण सोडवणार ?
- आरोग्य विभागात पगार कधीही ठराविक तारखेला होत नाही. पगाराची गाडी कायम विलंबाने धावत असते.
- दिवाळीपूर्वी पगार करावेत असे निर्देश होते. त्यासाठी नियोजन का केले गेले नाही ?
- खात्यात रक्कम डिडक्ट होण्यासाठी सुटीची अडचण येत नाही. मात्र, पैसे जमा व्हायला सुटी का आडवी येते ?
अर्थ विभागात ऐनवेळी माशी शिंकली
अर्थ विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही पगार झालेले नाहीत. ऐनवेळी तांत्रिक अडचण आल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. प्राथमिक विभागातील कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे पगार झाले, पण ऑक्टोबरचे झालेले नाहीत. दिवाळी अग्रीम मिळालेला नाही.
नियोजन करायला हवे होते
सरकारच्या आदेशानुसार, दिवाळीपूर्वीच पगार होण्यासाठी प्रशासनाने नियोजन करायला हवे होते, असे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कार्याध्यक्ष महेंद्र वानखेडे यांनी म्हटले आहे.