जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया न करणाऱ्या महाविद्यालयांची नावे येत्या दोन ते तीन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर झळकणार आहेत. त्यामुळे केवळ इशाऱ्यांवर न थांबता विद्यापीठाकडून प्रत्यक्ष कारवाई देखील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाने सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेण्यास विद्यापीठाच्या माध्यमातून कळवले होते. त्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत संस्था नोंदणी व आयआयक्यूए (अहवाल) ‘नॅक’ला सादर करायचा होता. ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर संबंधित महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. याला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्याचेही पालन काही महाविद्यालयांनी केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
पाच महाविद्यालयांचे प्रतिज्ञापत्र
नॅक मूल्यांकन व पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया न करणाऱ्या संस्थांमध्ये खान्देशातील १७ महाविद्यालयांचा समावेश होता. पण त्यापैकी पाच महाविद्यालयांनी मे व जून २०२४ पर्यंत नॅकची प्रक्रिया करण्याचे प्रतिज्ञापत्र विद्यापीठाला सादर केले आहे. उर्वरित १२ महाविद्यालयांनी काहीच केलेले नाही. त्यामुळे त्यांची संलग्नता का रद्द करू नये, अशी विचारणा करणारे पत्र त्यांना पाठवले जाणार आहे. त्यावर त्यांच्याकडून काय उत्तर येते, त्यानुसार नियमानुसार पुढील कार्यवाही विद्यापीठाकडून केली जाईल. नॅकची प्रक्रिया न करणाऱ्या महाविद्यालयांची नावे येत्या दोन ते तीन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जातील, अशी माहिती प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.