जळगाव - मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर औरंगाबादच्या पैठणनंतर प्रथमच एकनाथ शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर गेले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये जाहीर सभा घेत पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झाला, पण हे विरोधकांना चालत नाही. मात्र, जनेतेने आम्हाला स्वीकारलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांना चॅलेंजच दिलं.
सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतोय. गेल्या अडीच वर्षात जी कामं झाली नाहीत, ती केवळ अडीच महिन्यात आम्ही पूर्ण करत आहोत. त्यामुळेच, ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला यश मिळालंय, लोकांनी अडीच महिन्यातच आपल्याला स्विकारलंय. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत हे यश तुमचं आहे, तुम्ही काम केलंय. ग्रामंपायतीमधील यश म्हणजे ये तो सिर्फ झाँकी है... गुलबरावांनी आत्ता म्हटलंय. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है... असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर निशाणा साधला. तसेच, जळगावात गुलाबराव पाटलाचे प्रस्थ आहे. मात्र गुलाबराव पाटलांना हिणवले जाते. कुणीही हिणवण्याचे काम करू नये, असंही शिंदेंनी म्हटलं.
झोपेचं सोंग घेतलेल्यांना कसं उठवणार
राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला गिळायला होता, शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात विरोधकांना राष्ट्रवादीकडून ताकद दिली जात होती. याबाबत आम्ही पक्षप्रमुखांना अनेकदा बोललो, आमदार माझ्याकडे येत होते, मला अडचण सांगत होते. मीही 5 वेळा त्यांना बोलून दाखवलं, झालं ते झालं आत्ता फिटानफिट्ट झाली. आपण, भाजपसोबत जायला हवं, असं मीही म्हणलो. गुलाबरावही मला सांगत होते, तेही तेच बोलायचे. झोपलेल्यांना उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.