जळगाव : वाद्यवृंदांच्या गजरात हर्षोल्हासाच्या वातावरणात गुरुवारी, तालुक्यातील नशिराबाद येथे पोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या बैलांच्या शर्यतीचा कार्यक्रम पार पडला. पोळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पोळा सणाला यंदा आनंदाला उधाण आले होते.
आठवडे बाजाराच्या प्रांगणात बैलांची शर्यत झाली. सकाळी साडेअकरा वाजता पीक संरक्षण सोसायटीचे व्हाइस चेअरमन सुरेश रोटे यांनी बंदुकीचा बार फोडला अन् शर्यतीस प्रारंभ झाला. कल्याण बुरुज ते विठ्ठल मंदिर दरवाजापर्यंत बैलांची शर्यत झाली. त्यात विष्णू अशोक चौधरी व सागर रवींद्र पाचपांडे यांच्या बैलाने पोळा फोडला. त्यांना नगर परिषदेतर्फे मानाचा फेटा व नारळ देऊन गौरवण्यात आले व मानाची पुरणपोळीचा नैवेद्य देत औक्षण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, योगेश पाटील, माजी उपसरपंच किर्तीकांत चौबे, विनोद रंधे ,मुकुंदा रोटे,चंदू पाटील,निलेश रोटे ,किशोर पाटील, किरण चौधरी, तुळशीराम येवले, प्रकाश खाचणे, चंद्रकांत भोळे, मनोज रोटे, किरण तळेले, गणपत पाटील, ॲड.प्रदीप देशपांडे, किरण पाटील, विकास धनगर, धनराज राणे, प्रकाश बोंडे, सुनील पाटील, नोमदास रोटे, अनिल पाटील यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी...
पोळा सणानिमित्त बैलाची शर्यत पाण्यासाठी नशिराबादसह परिसरातील ग्रामस्थ व महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. बैलांची शर्यत पाहण्यासाठी अनेकांनी रस्त्याच्या दुतर्फा व इमारतींवर गर्दी केली होती. दुपारी पावसाचा शिडकावा झाल्यामुळे बळीराजा सुखावला.शिवशंकर ,हनुमान दर्शनाची प्रथा...
सर्जा राजाचे पूजन, आरती करीत शेती अवजारांचे पूजन करण्यात आले. गावात पोळा फोडल्यानंतर शेतकरी सर्जा राजाचे पूजन करतात. पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैलजोडींना भगवान शिवशंकर व हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले.