जळगाव : परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकिटच यापुढे ‘शिक्षे’चे स्वरुप सांगेल, अशा प्रकारचा अभिनव प्रयोग राज्यात सर्वप्रथम खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राबविणार आहे. त्याची माहिती शनिवारी, विद्यापीठ सिनेटच्या सभेत देण्यात आली.
परीक्षेत कॉपी केस झाल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षा निश्चित करण्यापूर्वी त्यांची सुनावणी घेतली जाते. मात्र, विद्यार्थी कॉपी संदर्भातील नियम व कायदे माहित नसल्याचा मुद्दा बचावासाठी पुढे करतात. त्यामुळे त्यांनाही याची माहिती होण्यासाठी विद्यापीठाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या वतीने तणाव मुक्त व कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेश पत्रावर कॉपी केल्यास कोणती शिक्षा होवू शकते याबद्दलची माहिती दिली जाणार आहे, परीक्षा पध्दतीत काही सुधारणा केल्या जातील, अशी माहिती सिनेटच्या सभेत सदस्यांना दिली.
३ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार
विद्यापीठाने कौशल्य विकासासाठी ६७ ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. बहिणाबाई चौधरी स्पर्धा परीक्षा फाऊंडेशन ऑनलाईन कोर्ससाठी ८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी मोबाईल सायन्स व्हॅनद्वारे तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशीही माहिती सिनेटच्या सभेत देण्यात आली.