जळगाव : वेतन खातेदाराला विमा संरक्षणासह इतर सुविधा जळगाव जिल्हा सहकारी बँक देऊ शकत नसेल, तर या बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन ते अडीच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची खाती जिल्हा बँकेत आहेत. नाशिक विभागात नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून होतात पण यामध्ये जळगाव जिल्हा अपवाद आहे. या दुजाभावावर शिक्षक संघटनांनी बोट ठेवले आहे. कोरोनामुळे जळगाव जिल्ह्यात काही प्राध्यापकांचा मृत्यू झाला. विमा संरक्षण असते, तर त्यांच्या वारसांना लाभ मिळाला असता. याकडेही लक्ष वेधले जात आहे.
म्हणून बदल हवाय
- जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँक या दोन्हींची तुलना केल्यास वेतन खातेधारकाला मिळणारे विमा संरक्षण, खात्यावरील अमर्यादित व्यवहार, आरटीजीएस/ एनईएफटी सुविधा, गृह व वैयक्तिक कर्जाचे व्याजदर, एटीएम सुविधा आणि इतर सुविधा यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे खाती वर्ग करण्याचा मुद्दा तापला आहे.- गेल्या काही महिन्यांपासून प्रा. अतुल इंगळे या विषयी पाठपुरावा करत आहेत. राज्यातील काही जिल्हा बँकांनी वेतन खातेधारकांच्या फायद्याचे निर्णय घेतले आहेत. जळगाव जिल्हा बँकेनेही विचार करायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे.
संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
शासनाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावे. त्या बँकांमध्ये वेतन खातेदाराला विमा संरक्षण मिळते. नाशिक विभागात केवळ जळगाव जिल्हा वंचित आहे. शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार यांनी केली आहे.
आमदारांची संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा
दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत नाशिक येथे बैठक घेतली. जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून अदा होण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.ॉ