जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेव्दारे विद्यार्थी हिताचे निर्णय घेता आले आणि शैक्षणिक विकासासाठी आपल्या परीने योगदान देता आले याचे समाधान आणि आनंद असल्याच्या भावना व्यवस्थापन परिषदेच्या समारोपाच्या बैठकीत सर्व सदस्यांनी व्यक्त केल्या.
३१ ऑगस्ट रोजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद प्राधिकरणातील सदस्यांची मुदत संपुष्ठात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी समारोपाची बैठक कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे उपस्थित होते. या बैठकीत दिलीप पाटील, प्रा. प्रशांत कोडगिरे, प्राचार्य आर.एस.पाटील, प्राचार्य एल.पी. देशमुख, प्राचार्य राजू फालक, प्रा.मोहन पावरा, डॉ.महेश घुगरी, दीपक पाटील, विवेक लोहार, डॉ.जितेंद्र नाईक, डॉ. प्रिती अग्रवाल यांनी गेल्या पाच वर्षात व्यवस्थापन परिषदेवर काम करीत असतांना आलेल्या अनुभवांचा आपल्या मनोगतात उल्लेख केला.
हे घेतले महत्वाचे निर्णयविद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठाचे कामकाज केले जात असून विद्यार्थी हिताच्या अनेक योजनांचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या माध्यमातून घेता आला. त्यामध्ये क्रीडा सुविधा, विद्यापीठ संचलित मोलगी येथील महाविद्यालय, विद्यार्थी साहित्य संमेलन, युवारंग, युवक महोत्सव, सामंजस्य करार, शुल्क माफी, कोरोना काळातील विद्यार्थी हिताचे निर्णय, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, नवउद्योजक घडविण्यासाठी केलेले प्रयत्न आदींचा उल्लेख सदस्यांनी मनोगतात व्यक्त केला.
यांची होती उपस्थितीकुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासात सर्व सदस्यांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला व भविष्यातही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.दीपक दलाल, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील उपस्थित होते.